| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ मे २०२५
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे उत्तरेकडील पर्यटनस्थळी गेलेल्या सांगली जिल्ह्यातील सुमारे २५० पर्यटकांचा परतीचा प्रवास मोठ्या अडचणीचा ठरला. काही भागांतील विमानसेवा थांबवण्यात आल्याने, पर्यटकांना शेवटी रस्ते प्रवासाचा पर्याय स्वीकारावा लागला.
जिल्ह्यातील अनेक कुटुंबांनी लेह-लडाख, काश्मीर, चंदीगड यांसारख्या थंड हवामानातील ठिकाणी महिन्याभरापूर्वी सहलीचे नियोजन केले होते. तेव्हाच भारत-पाकिस्तानमधील तणावाची शक्यता निर्माण झाली होती. या पर्यटकांनी वेळेत सहलीसाठी प्रस्थान केलं होतं, मात्र परतीच्या प्रवासात अडथळे आले.
पुण्यातून निघणाऱ्या चंदीगड, अमृतसर, जयपूर, हैदराबाद, कोची, जोधपूर, राजकोट आणि सुरत या शहरांकडे जाणाऱ्या एकूण १३ विमान सेवा काही दिवसांपासून रद्द झाल्या होत्या. त्यामुळे या मार्गांनी परतण्याचे बुकिंग केलेल्या पर्यटकांची योजना अचानक बदलावी लागली.
सांगलीतील विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांनी या पर्यटकांची सहल आखली होती. परतीच्या प्रवासात अडथळे आल्याने पर्यटकांना काही दिवस पर्यटनस्थळी थांबावे लागले. परिस्थिती थोडी स्थिर झाल्यानंतर ट्रॅव्हल कंपन्यांनी रस्ते मार्गाने पर्यायी व्यवस्था करून पर्यटकांना परतीचा मार्ग दिला.
कठीण प्रवासानंतर सुखरूप घरवापसी
पर्यटकांना अनेक वेळा वाहने बदलत मजल-दरमजल करत घरी परतावे लागले. प्रवास जरी सुरक्षित झाला असला, तरी तो वेळ आणि शारीरिक थकव्यास कारणीभूत ठरला. अखेर सांगलीत पोहोचल्यानंतर पर्यटकांनी मोठा नि:श्वास सोडला.
लेहमध्ये अडकलेल्या सुमारे २०० जणांच्या गटालाही हवाई मार्गाऐवजी रस्ते मार्गाने परतावे लागले. "या सर्व प्रवाशांना सुखरूप परत आणण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. प्रवास निश्चितच किचकट होता, पण पर्याय नव्हता," अशी माहिती ट्रॅव्हल व्यवसायिक मंगेश शहा यांनी दिली.