Sangli Samachar

The Janshakti News

चारशे वर्षांपूर्वीच्या 'त्या' वडाच्या झाडाचा वंशज वाढणार रामलिंग पठारावर !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ जुलै २०२४
रत्नागिरी नागपूर महामार्गावरील भोसे गावानजीक असलेला 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष जमीन दोस्त झाल्याने वृक्षप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. हा तोच वटवृक्ष ज्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरण प्रेमींच्या आवाहनाला दाद देत, भोसे येथील येथील रत्नागिरी नागपूर महामार्गाला वळण देत, वटवृक्षाचे रक्षण केले होते. परंतु आता हा वटवृक्ष जमीनदोस्त झाला आहे.

आरोग्य प्रेमी ग्रुपचे सर्व सदस्य

दरम्यान या वटवृक्षाच्या फांद्यातून त्याचे संवर्धन करण्यात येऊ शकते अशी माहिती या क्षेत्रातील तज्ञांनी दिली, त्यानुसार अनेक पर्यावरण प्रेमींनी या झाडांच्या फांद्यांपासून पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे या परिसरातील इतिहासाचा साक्षीदार असलेल्या सदर वटवृक्षाचे वंशज फांद्यांच्या रूपाने विविध भागात पुनश्च जिवंत होणार असल्याने पर्यावरण प्रेमींकडून समाधान व्यक्त होत आहे. अशाच फांद्यांचे पुनर्जीवन आता हातकणंगले तालुक्यातील रामलिंग धार्मिक क्षेत्रानजीक असलेल्या पठारावर करण्यात आले आहे. या माध्यमातून या ऐतिहासिक 400 वर्षे पुरातन वटवृक्षाचा वंशज, रामलिंगच्या पठारावरील नवपिढीला सावली देण्यासाठी सज्ज होतो आहे. आणि याचे श्रेय जाते ते, सांगलीतील " आरोग्य प्रेमी" परिवारातील सदस्यांना व कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांना.

माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या शुभहस्ते उपक्रमाचा शुभारंभ झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली येथील भाजपा नेत्या सौ. निताताई केळकर यांचे पती श्रीरंग केळकर यांच्या पुढाकाराने "आरोग्य प्रेमी" ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. या ग्रुप मार्फत प्रत्येक महिन्याला सदस्यांसाठी सांगली शहराच्या जवळपास असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात नेण्यात येते व तेथे वृक्षारोपणासह योगासने व अन्य उपक्रम राबवण्यात येतात.

आरोग्य प्रेमी ग्रुपचे सदस्य 


यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील रामलिंग पठारावर ट्रेकिंगचे नियोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून यावेळी "एक झाड आई"साठी हा उपक्रम राबविण्यात येणार होता. याची पूर्वतयारी म्हणून श्रीरंग केळकर यांच्यासह ग्रुप मधील काही सहकारी तेथे पोहोचले. तेव्हा तेथील वन अधिका-यांना या उपक्रमाची माहिती मिळाली. आणि त्यांनी श्रीरंग केळकर व सदस्यांना आवाहन केले की, तुमच्या भागातील भोसे येथील चारशे वर्षे पुरातन वटवृक्षाच्या फांद्यांचे येथे पुनरुज्जीवन करावे. सदस्यानी याला तात्काळ मान्यता दिली. आणि सर्व सुत्रे हलण्यास सुरुवात झाली.

यावेळी सांगलीचे टेलरिंग  व्यावसायिक  विजय मुळे यांनी सपत्नीक  वृक्षारोपण केले.

श्रीरंग केळकर यांनी याबाबत "आरोग्य प्रेमी वॉटस ऐप ग्रुप" वर माहिती देऊन रविवार दि. 30 जून 2024 रोजी रामलिंग पठारावरील वृक्षारोपणासाठी सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी तब्बल 200 सदस्यांनी यासाठी नोंदणी केली. इकडे हातकणंगले वन अधिकाऱ्यांनी सांगलीच्या वन अधिकाऱ्यांना याची कल्पना देऊन, या वटवृक्षाच्या फांद्या रामलिंग बेटावर पोहोचवण्याचे आवाहन केले. सांगलीच्या वन अधिकाऱ्यांनीही तात्काळ नियोजन करून 200 फांद्या आपल्या यंत्रणे मार्फत हातकणंगले पठारावर पोहोचवल्या. हातकणंगले वनविभागाने आपल्या यंत्रणेमार्फत शंभरहून अधिक खड्डे खणून शनिवारी रात्रीच सर्व तयारी पूर्ण झाली. 


सांगलीतील आरोग्य प्रेमी ग्रुपने 30 जून रोजी सांगलीतून रामलिंग येथे धुळेश्वर मंदिराच्या जवळ 100 वृक्षांची लागण केली. यामध्ये सुमारे 200 सदस्यांनी भाग घेतला होता. हातकणंगले येथील भाजपचे माजी आमदार श्री सुरेश हळवणकर आणि आळते गावचे सरपंच श्री अरुण इंगवले हे उपस्थित होते.  हा सांगलीतील आरोग्य प्रेमी ग्रुपसाठी थोडासा 'भावनिक  ओलावा'ही या उपक्रमामध्ये होता. सुमारे 50 स्वतःच्या  वाहनांमधून  यामध्ये सहभाग घेतलेला होता. यावेळी रामलिंग येथील वनविभागाचे देखील सहकार्य ही मिळाले. 


खूप वृक्षप्रेमींनी आंब्याची रोपे, जांभूळ, पिंपळ, इत्यादीची रोपे व  आणखी आंब्याच्या कोयी,  जांभळाच्या बिया इत्यादीचेही रोपण करण्यात आले.  लावलेली झाडांची निगा राखणे व त्या झाडाला संरक्षण मिळणे यासाठी सुद्धा आरोग्य प्रेमी ग्रुप सांगली प्रयत्नशील राहणार आहे. या उपक्रमामध्ये नीता केळकर यांच्याबरोबर आरोग्य प्रेमी ग्रुपचे संदीप कोकाटे, संजय कट्टी ,भावना शहा, चिंतामणी बोडस, श्रीरंग केळकर,अलका अट्टल, विपुल शहा, लता डफळे, राजीव तेरवाडकर, सौ. स्वाती मुळे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. वनविभागाचे वनरक्षक श्री महेश खामकर व श्री मंगेश वंजारी यांनी सहकार्य केले.