yuva MAharashtra पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांपुढे नवं संकट उभं ?

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांपुढे नवं संकट उभं ?


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २१ मे २०२५

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेसंदर्भात नव्या चिंता निर्माण झाल्या आहेत. दिल्लीत यामुळे उच्चस्तरीय सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, जम्मू-काश्मीरमध्ये एक धोकादायक प्रवृत्ती दिसून येतेय — दहशतवादी आता सुरक्षा दलांच्या वेशभूषेचा वापर करून हल्ले करत आहेत.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी पर्यटकांवर अचानक गोळीबार केला. विशेष बाब म्हणजे, हल्लेखोरांनी भारतीय लष्कराच्या वर्दीसारखे कपडे घातले होते, ज्यामुळे सामान्य लोक आणि सुरक्षादल यांच्यासाठी ओळख पटवणे कठीण ठरले. या क्रूर हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला असून, त्यामध्ये एक नेपाळी नागरिकही होता.

यानंतर १० मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, जम्मूच्या नगोटरा मिलिट्री स्टेशनवर आणखी एक हल्ला परतवून लावण्यात आला. या वेळीही अतिरेक्यांनी सैनिकी वेशभूषा घातली होती. मात्र, सैन्याच्या सजगतेमुळे ते मागे हटायला भाग पडले.

सुरक्षादलांच्या वर्दीचा गैरवापर ही नवी धोक्याची घंटा ठरत आहे. यामुळे देशभरात सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर चर्चा सुरु झाली आहे. दिल्लीमध्ये या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक पार पडली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, अतिरेक्यांची ही युक्ती केवळ भ्रामकच नाही, तर जनतेचा सुरक्षायंत्रणांवरील विश्वास डळमळीत करण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे.

या बैठकीत देशातील प्रमुख सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले होते. नव्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) अद्ययावत करण्यात आले आहेत. विशेषतः पर्यटन स्थळांवर विशेष लक्ष देत, कोण शत्रू आणि कोण मित्र हे ओळखण्याची जबाबदारी आता अधिक सजगतेने सैन्यदलांवर सोपवण्यात आली आहे.