| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २१ मे २०२५
सध्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत सुरू केलेल्या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तान पुरता हादरला आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या लष्करी क्षमतेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. अशाच वेळी भारतात तयार होत असलेल्या एका आधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरची देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. हे हेलिकॉप्टर अद्याप सेवा कार्यात दाखल झालेले नसतानाही शत्रुराष्ट्रांमध्ये चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत संरक्षण मंत्रालयाने अमेरिका सरकारसोबत सुमारे ७.३ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. या कराराअंतर्गत भारताला 'LCH प्रचंड' या अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरच्या १५६ युनिट्सच्या खरेदीस मान्यता मिळाली आहे. ही महत्त्वाची पायरी भारताच्या संरक्षण क्षेत्राला अधिक बळकटी देणारी ठरणार आहे. हे हेलिकॉप्टर अद्याप प्रत्यक्ष सैन्यात सामील झाले नसले तरी, त्याची क्षमता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः चीनमध्ये त्याबद्दल मोठी चर्चा सुरु आहे.
भारतातील हे नवीन हेलिकॉप्टर उच्च दर्जाचे सामरिक तंत्रज्ञान वापरून बनवले गेले असून, चीनच्या Z-10 हेलिकॉप्टरपेक्षा अधिक प्रभावी मानले जात आहे. चीनच्या एका प्रसिद्ध माध्यम संस्थेने असा दावा केला आहे की भारत हे हेलिकॉप्टर भविष्यात कोणत्याही संभाव्य संघर्षात प्रभावीपणे वापरू शकतो. या चर्चेमुळे चीनचे लष्करी विश्लेषक भारतीय हवाई दलाच्या सशस्त्र क्षमतेवर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचे स्पष्ट दिसते.