yuva MAharashtra भारत घेतोय क्षेपणास्त्राची चाचणी ? अंदमान समुद्रातील आकाश विमान वाहतुकीसाठी बंद !

भारत घेतोय क्षेपणास्त्राची चाचणी ? अंदमान समुद्रातील आकाश विमान वाहतुकीसाठी बंद !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २३ मे २०२५

पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचलल्यानंतर भारताने आता आणखी एक महत्त्वाची तयारी सुरू केली आहे. अंदमान समुद्राच्या परिसरातील हवाई क्षेत्र दोन दिवसांसाठी पूर्णतः बंद करण्यात आले आहे. ही बंदी २३ मेच्या सकाळपासून सुरू झाली असून ती २४ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

भारतीय संरक्षण यंत्रणेकडून जारी करण्यात आलेल्या NOTAM (Notice to Airmen) मुळे संपूर्ण जगाचे लक्ष या हालचालीकडे वेधले गेले आहे. भारत कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र किंवा शस्रास्त्र प्रणाली चाचणीसाठी सज्ज झाला आहे, याबाबत सध्या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने डमी विमानांचा वापर करत पाकिस्तानची फसवणूक केली होती. पाकिस्तानने राफेल समजून जे विमान लक्ष्य केले, ते प्रत्यक्षात केवळ बनावट होते. त्यानंतर भारताने वापरलेली आकाश व ब्रह्मोस मिसाईल प्रणाली पाकिस्तानसाठी मोठा झटका ठरली. या हल्ल्यांत दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आणि पाकिस्तानचे ११ हवाई तळ निष्क्रिय करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर आता भारताकडून अंदमान समुद्राच्या हवाई क्षेत्रात ५०० किलोमीटरपर्यंत विस्तारित भागात नागरी विमान वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व उंचीवर उड्डाण करणाऱ्या विमानांसाठीही ही बंदी लागू आहे. त्यामुळे येत्या काही तासांत महत्त्वाची क्षेपणास्त्र चाचणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


NOTAM म्हणजे वैमानिकांसाठी दिली जाणारी विशेष सूचना होय, जी संभाव्य धोका टाळण्यासाठी जारी केली जाते. या सूचनेद्वारे कोणतेही विमान संबंधित भागातून जाण्यास मनाई केली जाते. या काळात परवानगी दिली जात नाही आणि सुरक्षा राखण्यासाठी अत्यंत काटेकोर उपाययोजना केल्या जातात.

याआधीही भारताने अशा प्रकारचे NOTAM जाहीर केले होते. मात्र, पाकिस्तानविरोधातील अलीकडच्या युद्धसदृश कारवायांनंतर सद्यस्थितीत जारी करण्यात आलेले NOTAM अधिक चर्चेत आले आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अंदमानमध्ये हवेतून मारा करणाऱ्या बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती, तर मार्च २०२२ मध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रही यशस्वीपणे चाचण्यात आले होते. त्यामुळे यंदाची चाचणीही काहीतरी महत्त्वाचे दाखवण्याची शक्यता आहे.