| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ मे २०२५
सांगली नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर होऊन २६ वर्षे झाली. या पावशतकाहून अधिक कालखंडात सांगली स्मार्ट सिटी होणे अपेक्षित होते. याबाबत सांगली कराची घोर निराशा झाली आहे.
मान्सूनपूर्व नाले सफाई योजना बारगळली आहे. नाल्यातील घाण पाणी अवकाळी पावसामुळे नागरी वस्तीत व कांही ठिकाणी उपनगरातील रस्त्यावर पसरत आहे. संजयनगर, वसंतनगर, पार्श्वनाथनगर, अभयनगर, वसंतनगर या उपनगरात उन्हाळ्यात भुयारी गटार योजनेसाठी रस्ते खुदाई झाली. अद्याप हे काम पूर्णही झाले नाही. कांही ठिकाणी भुयारी गटारीवर चेंबरसुध्दा बांधले नाहीत.
वसंतनगर मध्ये किड्स पॅराडाईज स्कूल पासून स्वाती भारत गॅस पर्यंत निम्म्या भुयार गटारीवर चेंबर न बांधता ठेकेदार गायब झाला आहे. रस्ते उरकल्यानंतर पुन्हा ते दुरुस्त करणे आवश्यक असताना चरी व्यवस्थित मुजवले नाहीत. त्यात भरीस भर म्हणून पुन्हा गॅस पाईपलाईनसाठी तेच रस्ते पुन्हा उकरले. आज वसंतनगर भागात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
अवजड वहाने वाहतुकीने रस्त्यावर भगदाड पडून वाहने स्लीप होऊन चिखल माती नागरिकांच्या दारासमोर साठून घरातून वहाने बाहेर काढणे मुश्किल झाले आहे. वास्तविक गॅस पाईप लाईन रस्ते खोदाई न करता अंडरग्राऊंड ड्रिलींग करुन करायचे असते. हा सगळा नागरिकांना त्रास देणारा ठेकेदारांचा भोंगळ कारभार सुरु असताना महापालिका प्रशासन सुस्त आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्तावरील चिखलातून चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक पाय घसरुन पडत आहेत. कांहीना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अशा बेजबाबदार कारभाराला तातडीने लगाम घालून उपनगरातील चिखलमय रस्ते दुरुस्ती करण्याची नागरिकांची आग्रही मागणी आहे. आयुक्तांनी वसंतनगर, अभयनगर, पार्श्वनाथ नगर, संजयनगर, कारखाना परिसर व कुपवाड भागातील उपनगरांना संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पहाणी करावी व रस्ते चिखलमुक्त करुन नागरिकांना दिलासा द्यावा.
हवामान खात्याने यंदा भरपूर पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना करावी ही सांगलीकरांची मागणी रास्त आहे.. आता आयुक्तांच्या कार्यक्षमतेची कसोटी आहे हे मात्र नक्की.
बातमी स्रोत - पल्लवी पाटील /सांगली