| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ मे २०२५
कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना शिवप्रेमी आणि विचारवंत संभाजी भिडे गुरुजींनी रायगडावरील ६ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी ठाम मत मांडले. त्यांनी सूचवले की, या सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत असल्याने तो कायमस्वरूपी बंद करावा. याऐवजी महाराजांचे सर्व कार्यक्रम तिथीप्रमाणे पार पडावेत, असे त्यांचे मत आहे.
भिडे गुरुजींनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर देखील भाष्य केले. त्यांनी सांगितले की, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची गरज नाही. या पुतळ्याच्या निमित्ताने अनावश्यक राजकारण होऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली.
इतिहास संशोधकांवर टीका करत भिडे यांनी विचारले की, वाघ्या कुत्र्याबद्दल मत मांडणारे इतिहास संशोधक नेमके कोणत्या दर्जाचे आहेत? या विषयावर योग्य निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र इतिहास अभ्यासकांचे मंडळ स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
भिडे गुरुजी त्यांच्या सडेतोड मतांसाठी ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी रायगडावरील शिवराज्याभिषेक आणि वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती, ज्यामुळे त्या वेळीही वाद निर्माण झाले होते. मात्र, जनमताच्या प्रतिक्रिया लक्षात न घेता स्पष्टपणे विचार मांडणे ही त्यांची विशेषता राहिली आहे.
भिडे गुरुजींचे हे नविन विधान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.