yuva MAharashtra रितू खोखर यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती !

रितू खोखर यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ मे २०२५

भारतीय पोलीस सेवेतील २०१८ च्या तुकडीतील अधिकारी रितू खोखर यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. राज्याच्या गृह विभागाने आज २२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करत ही नियुक्ती केली.

रितू खोखर यांची नोव्हेंबर २०२३ मध्ये सांगली येथे अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती. त्या काळात त्यांनी जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार प्रतिबंधासाठी तसेच गुन्हेगारी नियंत्रणासाठी विशेष मोहीम हाती घेतली. गुन्ह्यांचे जलद निकाली निवारण आणि हरविलेल्या मुलींच्या शोधासाठी राबवलेल्या मोहिमांना विशेष यश मिळाले. त्यांनी गुन्हेगारीविरोधात ‘ऑक्शन प्लॅन’ तयार करून प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली सांगली पोलिस दलात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले.


खोखर या मूळच्या हरियाणामधील पानिपत येथील असून त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून गणित विषयात एम.एस्सी. करताना सुवर्ण पदक मिळवले आहे. त्यांनी २०१७ च्या यूपीएससी परीक्षेत देशात १४१ वा क्रमांक मिळवत आयपीएस सेवेत प्रवेश केला होता.

त्यांच्या बदलीमुळे सांगलीचे अपर पोलिस अधीक्षकपद सध्या रिक्त झाले असून, त्याठिकाणी कोणाची नियुक्ती होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.