yuva MAharashtra ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया’ योजनेत सांगलीचा देशात तिसरा क्रमांक !

‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया’ योजनेत सांगलीचा देशात तिसरा क्रमांक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ मे २०२५

पाच वर्षांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ राबवण्यात सांगली जिल्ह्याने देशभरात तिसरा क्रमांक पटकावला आहे. 2020-21 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा 2025-26 हा अंतिम टप्पा असून, जिल्ह्यात अजून एक हजार प्रकल्प राबवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ही माहिती दिली.

केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात आजपर्यंत 1,320 प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, यासाठी लाभार्थ्यांना सुमारे 38 कोटी 18 लाख रुपयांचे अनुदान दिले गेले आहे. या प्रकल्पांमुळे जवळपास 5,955 कुशल व अर्धकुशल व्यक्तींना रोजगार मिळाला आहे.

अंतिम वर्षासाठी मोठे उद्दिष्ट

योजनेच्या शेवटच्या वर्षात जिल्ह्यात आणखी एक हजार प्रकल्प उभारण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यासाठी 20 कोटी रुपयांचा अनुदान निधी प्रस्तावित असून, यामुळे अंदाजे 5,000 नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही काकडे यांनी सांगितले.

योजनेचा हेतू काय ?

शेतीमाल, दुग्धजन्य व अन्य कृषी उत्पादने यांच्यावर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धन करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातून एकच व्यक्ती पात्र असते. प्रकल्पासाठी किमान 10 टक्के स्वतःचा हिस्सा व उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात उचलण्याची तयारी असावी. तसेच, संबंधित उद्योगाला औपचारिक नोंदणी द्यावी लागते.


सांगलीतील प्रमुख प्रकल्पांची यादी

या योजनेंतर्गत जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये विविध प्रकारच्या अन्न प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. बेदाणा प्रक्रिया – 317 प्रकल्प, तृणधान्य प्रक्रिया – 177, कडधान्य प्रक्रिया – 154, मसाला उद्योग – 233, दुग्ध प्रक्रिया – 77, फळ व भाजीपाला प्रक्रिया – 45, बेकरी पदार्थ – 133, गूळ प्रक्रिया – 20, खाद्यतेल प्रक्रिया – 48, पशुखाद्य निर्मिती – 41 आणि इतर उद्योग – 75 अशा विविध क्षेत्रात हे प्रकल्प यशस्वीपणे उभारले गेले आहेत.