| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २३ मे २०२५
आजकाल बहुतांश नागरिक डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. किराणा दुकानांपासून मॉलपर्यंत बहुतांश व्यवहार Google Pay, PhonePe, Paytm, BHIM यांसारख्या अॅप्सच्या माध्यमातून होत आहेत. जर तुम्ही देखील या अॅप्सचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे – कारण येत्या 30 जून 2025 पासून UPI व्यवहारांसाठी नवे नियम लागू होणार आहेत.
UPI व्यवहारांसाठी नवे कायदे – काय बदलणार?
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. 30 जूनपासून, UPIद्वारे पैसे पाठवताना प्राप्तकर्त्याचे बँकेत रजिस्टर्ड असलेले संपूर्ण नाव युजरला अॅपवर दिसणार आहे. आतापर्यंत फोन किंवा अॅपमध्ये दाखवले जाणारे निकनेम किंवा टोपणनाव याऐवजी आता मूळ नावच दिसेल. यामुळे फसवणुकीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसेल.
या नव्या नियमानुसार काय फायदे होतील?
- व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीचे बँकेत नोंदलेले खरे नाव दिसणार, त्यामुळे स्कॅमर्सना ओळख लपवता येणार नाही.
- युजरला खात्री मिळेल की आपले पैसे योग्य व्यक्तीलाच दिले जात आहेत.
- यूपीआय प्रणालीवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि सुरक्षिततेचा स्तरही वाढेल.
हे नियम कोणत्या व्यवहारांना लागू होतील?
- हे नवे नियम दोन्ही प्रकारच्या व्यवहारांवर लागू होणार आहेत:
- व्यक्ती ते व्यक्ती (P2P) व्यवहार – जसे की मित्र-नातेवाईकांमध्ये पैसे पाठवणे.
- व्यक्ती ते व्यापारी (P2M) व्यवहार – दुकान, व्यवसाय किंवा सेवांसाठी पेमेंट करताना.
नवीन यंत्रणा कशी काम करेल?
युजरने QR कोड स्कॅन केल्यावर किंवा मोबाईल नंबर/UPI आयडीद्वारे पेमेंट करताना, अॅपवर समोरच्या व्यक्तीचे बँकेत नोंदलेले अधिकृत नाव दिसेल. यामुळे चुकीच्या व्यक्तीला पैसे जाण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होईल.