yuva MAharashtra द. भा. जैन सभेच्या माजी अध्यक्ष श्रीमती शरयु दफ्तरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली !

द. भा. जैन सभेच्या माजी अध्यक्ष श्रीमती शरयु दफ्तरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ मे २०२५

दक्षिण भारत जैन सभेच्या माजी अध्यक्ष, प्रथितयश उद्योजिका श्रीमती शरयु दफ्तरी १६ मे २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या कार्याचा हा आढावा...

श्रीमती शरयु दफ्तरी यांचा जन्म १९३३ मध्ये, मुंबईतील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वालचंद उद्योग समूहाच्या कुटुंबात ललिताबाई आणि उद्योगपती लालचंद हिराचंद यांच्या पोटी झाला. त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमधून अर्थशास्त्रात (बीए) पदवी प्राप्त केली आणि वयाच्या १९ व्या वर्षी अरविंद गौरीशंकर दफ्तरी यांच्याशी विवाहबद्ध झाले.

त्यांनी १९५८ मध्ये रुपये दोन लाख भांडवल आणि पाच कामगारांसह भारत रेडिएटर्स लिमिटेड ही ऑटो पार्ट्स उत्पादन करणारी कंपनी स्थापन केली, जेव्हा त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या आणि तेव्हापासून त्या व्यवसायाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. भारतीय औद्योगिक क्षेत्रात त्यांचे लक्षवेधी योगदान आहे. आणि १९७१ मध्ये जेव्हा त्या ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसीएमए) च्या अध्यक्षपदी निवडल्या गेल्या तेव्हा त्या या पदावर निवडून येणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

इंडियन मर्चंट्स चेंबर (आयएमसी) (१९८१) च्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसीआय) च्या कार्यकारी समितीच्या सदस्य म्हणून निवडल्या जाणाऱ्या पहिल्या महिला होण्याचा मानही त्यांना मिळाला .  दक्षिण भारत जैन सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा  होण्याचा मान त्यांना जातो आणि त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेल्या आणि जैन समुदायाचे मुखपत्र असलेल्या जैन बोधक या पाक्षिकाच्या त्या संपादिका होत्या. 

श्रीमती शरयू दफ्तरी  यांना जैन समाजाचा जैनरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांना भारत सरकारने २००४ चा पद्मश्री हा नागरी सन्मान प्रदान केला आहे.  दफ्तरी दाम्पत्याला तीन मुली आहेत. मोठी मुलगी, झाई शाह, एक रेस्टॉरंट मालक आहे , गौरी पोहोमल एक उद्योजक आणि परोपकारी आहे आणि सर्वात धाकटी, कविता खन्ना, गृहिणी आहे आणि तिचे लग्न अभिनेता विनोद खन्ना यांच्याशी झाले होते . 


त्यांनी पुस्तिका व पत्रकाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती व शाकाहार चळवळ उभी केली होती. त्यासाठी त्या वारंवार स्व. डॉ. धनंजय गुंडे व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्याशी संवाद साधून मदत करायच्या. तीर्थंकर मासिकाचे संपादक श्रेणिक अन्नदाते यांच्यावर त्यांचा दांडगा विश्वास होता. 

दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दल मध्यवर्ती समिती आणि कोल्हापूर जैन बोर्डिंगमधील माझे चांगले कामकाज पाहून त्यांनी मला श्रेणिक अन्नदाते यांच्या शिफारशी नुसार भारत रेडिएटर्सच्या खोपोली येथील कारखान्यात जनरल मॅनेजर पदाची ऑफर दिली होती. मुंबईत कंपनी कार्यालयात त्यांची कन्या कविता खन्ना यांनी माझी मुलाखतही घेतली होती. परंतु डॉ. धनंजय गुंडे व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी मला तुम्ही एक चांगला प्राध्यापक होऊ शकता आणि तुमची दक्षिण भारत जैन सभेला खरी गरज आहे असे सांगून एम. ए. करायचा सल्ला दिला. त्यामुळे मी शरयूताई यांची ऑफर नाकारली. आज त्या प्रसंगाची आठवण झाली. त्या रत्नपारखी होत्या हे मी अनुभवले आहे. 

श्रीमती शरयू दफ्तरी या दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षस्थानी असताना त्यांच्या नेतृत्वाखाली सभेने दमदार वाटचाल केली होती आणि सभेला त्यांच्यामुळे राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. सभेच्या जनरल बाॅडीत व मध्यवर्ती कार्यकारी मंडळात त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे होत असत. त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत गेटकेन ऊस प्रकरण गाजले होते. या प्रकरणी सभेच्या बैठकीत त्यांनी सडेतोड मते व्यक्त केली होती. 

बाहुबली प्रकरणात त्या स्वतः बाहुबलीत ठाण मांडून होत्या. गुरुदेव समंतभद्र महाराज आचार्यश्री विद्यानंदजी, आचार्य आर्यनंदी जी, आचार्यरत्न देशभूषणजी, आचार्य बाहुबली महाराज यांच्यावर त्यांची निःसीम भक्ती होती. मुनी-आर्यिका यांच्या आहार विहार प्रसंगी त्यांचा सक्रिय सहभाग व मदत खूप मोठी होती. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे आणि वीर सेवा दलाच्या कार्याचा त्या अभिमानाने उल्लेख करायच्या. पंथभेद बाजूला ठेवून सारा जैन समाज दक्षिण भारत जैन सभेच्या एकाच छताखाली येऊन आपली सर्वांगीण प्रगती करुन घ्यावा असा त्यांचा खास आग्रह होता. 

अशा कर्तबगार जैन महिला उद्योजिका शरयूताईंचे काल दि. १६ मे २०२५ रोजी निधन झाले. शरयूताईंच्या आत्म्यास चिरशांती व सदगती लाभो हिच जिनचरणी प्रार्थना. 
भावपूर्ण श्रद्धांजली !

प्रा. एन.डी.बिरनाळे 
महामंत्री (सांगली) 
दक्षिण भारत जैन सभा महापरिवार, सांगली.