| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० मे २०२५
कुंडल येथील प्राचीन जैन मूर्तीची झालेली विटंबना यामुळे संतप्त झालेल्या जैन समाजाने शुक्रवारी गावात मूकमोर्चा काढून तीव्र निषेध नोंदवला. दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा समाजातर्फे तहसीलदार व पोलिस प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला.
या शांततामय आंदोलनात आमदार अरुण लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, कुंडलिक एडके, दक्षिण जैन भारत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, महामंत्री डॉ. अजित पाटील, उद्योजक बी. आर. पाटील, राजू मदवाने, वसंत राजमाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी समाजातील विविध नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या समाजाच्या श्रद्धास्थानांवर झालेला अपमान सहन केला जाणार नसल्याचे सांगितले.
नेत्यांनी नमूद केले की, कुंडल हे प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे आजपर्यंत कोणत्याही अपवित्र घटना घडल्या नव्हत्या. या क्षेत्राची केवळ जैन समाजच नव्हे तर इतरही समाजांकडून ग्रामदैवत म्हणून श्रद्धेने पूजा केली जाते. परंतु अलीकडच्या काही वर्षांत बाहेरील काही समाजकंटक या पवित्रतेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
किरण लाड यांनीही संतप्त भावना व्यक्त करत सांगितले की, या गावाची अहिंसेची परंपरा आणि क्रांतिवीर डॉ. जी. डी. बापूंचा विचार आहे. त्यामुळे जो कोणी समाजात तेढ निर्माण करेल, त्याला खड्यासारखे बाहेर फेकले जाईल.
या मूकमोर्चात कुंडलसह बुर्ली, वाळवा, आष्टा, तुपारी, रामानंदनगर, पलूस, भिलवडी, अकलूज, जयसिंगपूर, सांगली, नातेपुते, वडूज अशा विविध भागांतील जैन समाजबांधव सहभागी झाले होते. वीर सेवा दल, ग्रामपंचायतीचे सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच किरण लाड, अॅड. दीपक लाड, सिमंधर गांधी, वैभव व शीतल शहा, राजकुमार चौगुले, दीपक वर्णे, सचिन लडगे, प्रफुल पाटील, सचिन कत्ते, साईदास लाकुळे, नितीन कोल्हापुरे, विजय राजमाने यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.