| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० मे २०२५
खरीप हंगाम जवळ येत असताना, शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके मिळू नयेत यासाठी कृषी विभागाने सजग राहण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. बोगस माल विकणाऱ्या पुरवठादारांवर थेट कारवाई करत त्यांना अटक करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर, सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर, कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी दर्जेदार खते, बियाणे व औषधांचा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. कृषी विभागाने नियमित तपासणी करून बोगस विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून इतरांना धडा मिळेल. तसेच शेतकरी ओळखपत्र महत्त्वाचे असल्याने, प्रत्येक शेतकऱ्याचे ओळखपत्र तयार व्हावे यासाठी प्रयत्न करावेत.
चांगल्या बियाण्यांचा पुरवठा होणार – जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले की, खरीप हंगामासाठी योग्य व दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. बोगस माल विक्रीवर कठोर लक्ष ठेवले जाईल.
खते-बियाण्याचा साठा तयार – कृषी अधिकारी कुंभार
जिल्हा कृषी अधीक्षक विवेक कुंभार यांनी माहिती दिली की, यंदाच्या खरीप हंगामासाठी २८,५०१ क्विंटल बियाण्याची गरज असून ती १५ मेनंतर मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, १,९४,२९३ टन खताची मागणी करण्यात आली आहे. सध्या ६६,७०८ टन खत साठा उपलब्ध असून, आजअखेर १४,२१७ टन खताचा पुरवठा झाला आहे.
नैसर्गिक शेतीसाठी एक गाव निवडा – पालकमंत्री पाटील
शेतीला पर्यायी मार्ग देत नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी कृषी विभागाने एक गाव निवडून तिथे नैसर्गिक शेतीचा प्रयोग करावा, असेही पाटील यांनी सांगितले. अशा गावातील उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यात येईल आणि उत्पादनातील तुटीसाठी आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.