| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० मे २०२५
सांगली शहरातील प्रतिष्ठित उद्योजक, समाजसेवक आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले अरुण रंगनाथ दांडेकर (वय ७५) यांचे गुरुवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे आणि बंधू असा मोठा परिवार आहे.
दांडेकर यांचे मूळ गाव शिराळा तालुक्यातील बिळाशी हे असून, त्यांच्या वडिलांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. वडिलांच्या प्रेरणेतूनच त्यांनी सांगलीत किराणा व्यवसायाला प्रारंभ केला. एक छोटंसं दुकान ते भव्य दांडेकर मॉल – हा त्यांचा प्रवास प्रामाणिकपणाचा आणि कष्टाचा आदर्श ठरला.
दांडेकर यांनी शहरातील ४० हून अधिक सामाजिक संस्थांशी सक्रिय सहभाग राखला. ब्राह्मण नागरी पतसंस्थेची स्थापना, चेंबर ऑफ कॉमर्समधील योगदान, तसेच सांगली रोटरी क्लबच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा होता. यंग मेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य केले.
सांगली समाचार वृत्तपत्रावर त्यांचा विशेष स्नेह होता. त्यांचे मार्गदर्शन नेहमीच उत्साहवर्धक असायचे. आर्थिक बाबीतही त्यांनी समाचारला झुकते माप दिले होते.
त्यांनी 'सूर पहाटेचे' या संगीत उपक्रमाची सुरुवात २७ वर्षांपूर्वी गुढी पाडव्याच्या निमित्ताने केली. स्थानिक कलाकारांना मंच मिळावा हा हेतू त्यांच्या मागे होता. नाट्य क्षेत्रातही ॲक्टिव्ह ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिले. विश्वजागृती मंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या सांगलीभूषण पुरस्कारांमागेही त्यांची दूरदृष्टी होती.
त्यांनी निधनानंतर नेत्रदान व त्वचादानाचा संकल्प केला होता. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंतिम दर्शनासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.