| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. २१ मे २०२५
शिंगणापूर येथे पीक पाहणीस गेलेल्या महसूल सेविकेवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक आरोपी – दादासाहेब लवटे – याला अटक केली असली, तरी उर्वरित दोन महिला संशयित अद्यापही मोकाट असल्याने संतप्त महसूल कर्मचारी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या दोघींना तातडीने अटक न केल्यास महसूल कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोळी, बाळासाहेब चव्हाण, विनोद कोळी, चिंतामणी साळे, सुहास पारसे, चनाप्पा भोसले, मलाप्पा कोळी, मानतेश नाईक, शहानाज भालदार, रमेश कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कुडनूर सजाचे तलाठी प्रकाश पाटील यांच्या तोंडी आदेशानुसार महसूल सेविका यल्लूबाई नाईक शनिवारी शिंगणापूर येथे पीक पाहणीसाठी गेल्या होत्या. या वेळी दादासाहेब लवटे व त्यांच्या पत्नीने ऊसाऐवजी द्राक्षपीक नोंदवण्याची मागणी केली. मात्र, नियमांनुसार नोंद करता न आल्याने त्यांनी महसूल सेविकेवर जोरदार हल्ला केला. या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.