yuva MAharashtra विघ्नहर्त्याच्या मूर्ती अन् कायद्याचे विघ्न; वाद न्यायालयात !

विघ्नहर्त्याच्या मूर्ती अन् कायद्याचे विघ्न; वाद न्यायालयात !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ मे २०२५

गणेशोत्सवाला अवघे तीन महिने उरले असताना, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तींवरील बंदीमुळे मूर्तिकामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण संवर्धनाच्या कारणास्तव पीओपी मूर्तींवर बंदी घातल्याने हा विषय थेट न्यायालयात गेला आहे.

मिरज शहरातील अनेक मूर्तिकार आणि कामगार यामुळे कामाविना बसले असून, त्यांच्या रोजीरोटीवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात दरवर्षी सुमारे ५० हजार घरगुती गणपती आणि सुमारे ४०० सार्वजनिक मंडळांतून उंच मूर्तींची प्रतिष्ठापना होते. मात्र यंदा पीओपीवरील बंदीमुळे अजूनही मोठ्या मूर्तींची निर्मिती सुरू झालेली नाही.

या विषयावर येत्या ९ जून रोजी न्यायालयात सुनावणी होणार असून, निर्णय उशिरा झाल्यास पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मूर्ती तयार करणे कठीण होणार आहे, असा मूर्तिकारांचा सवाल आहे. मूर्तिकारांचं म्हणणं आहे की पीओपी मूर्ती जगभरात वापरल्या जात असताना केवळ महाराष्ट्रातच बंदी का? जर पीओपी खरोखरच पर्यावरणासाठी हानिकारक असेल तर त्यावर संपूर्ण बंदी आणावी, फक्त गणेश किंवा देवीच्या मूर्तींवरच नाही.

शाडू मातीच्या मूर्ती तुलनेत नाजूक व जड असल्याने उंच मूर्ती तयार करताना तांत्रिक अडचणी येतात, असं मूर्तिकार गजानन सलगर सांगतात. ते पुढे म्हणाले की, शाडू मूर्ती वाळायला जास्त वेळ लागतो आणि ती महागही पडते. मात्र, न्यायालय जो निर्णय देईल, तो सर्वांना मान्य करावा लागेल.


दरम्यान, २०२० मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी बंदीबाबत मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली होती. त्यावेळी विविध मंडळांनी मूर्तिकारांच्या अडचणी केंद्र सरकारपुढे मांडून नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने हा विषय आता न्यायालयाच्या दरवाजात पोहोचला आहे, अशी माहिती शनिवार पेठ गणेश मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र कुल्लोळी यांनी दिली.