| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ मे २०२५
कर्नाटक सीमेलगतच्या अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणपट्ट्यात २१ ते ३१ मेदरम्यान मान्सूनपूर्व पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत काही भागांमध्ये अति जोरदार सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे.
वळवाच्या पावसामुळे सध्या राज्यात तापमानातील घट जाणवली असून, कमाल व किमान तापमान सरासरीच्या खाली नोंदवले जात आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते, येत्या काही दिवसांतही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा परिणाम अधिक जाणवणार आहे.
अवकाळी पावसाचा फटका; पंचनाम्यांचे आदेश
राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे २७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १३ हजार हेक्टर तर नाशिक जिल्ह्यात सुमारे ५,८५० हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले असल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.