| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ मे २०२५
आजच्या डिजिटल युगात कर्ज मिळवणे खूपच सुलभ झाले आहे. गरज पडल्यास व्यक्ती थोडक्याच वेळात बँकेमार्फत किंवा अॅपच्या माध्यमातून लोन घेऊ शकते. मात्र, अनेक वेळा आर्थिक तंगीमुळे वेळेवर हप्ते भरता येत नाहीत. अशावेळी कर्ज वसूल करणारे एजंट घरी येऊन दबाव टाकू लागतात, फोनवर त्रास देतात, आणि काही वेळा अयोग्य भाषाही वापरतात.
वसुली एजंट अशा प्रकारे का त्रास देतात?
बँक किंवा वित्तीय संस्था जेव्हा वेळेवर पैसे मिळवत नाहीत, तेव्हा ते वसुलीसाठी एजंट पाठवतात. या एजंटांचे काम थकबाकी वसूल करणे असते. परंतु, हे करताना काही एजंट नियम मोडून वागत असतात. त्यामुळेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वसुली प्रक्रियेबाबत ठराविक नियम घालून दिले आहेत.
RBI चे स्पष्ट नियम काय सांगतात ?
- रिकव्हरी एजंट सकाळी ८ वाजण्याच्या आधी किंवा रात्री ७ नंतर संपर्क साधू शकत नाहीत.
- धमकावणे, शिवीगाळ करणे किंवा मानसिक त्रास देणे बेकायदेशीर आहे.
- एजंटने अशा पद्धतीचा वापर केल्यास, संबंधित बँकेकडे आणि आरबीआयच्या बँकिंग लोकपालाकडे तक्रार करता येते.
तुमच्यावर अन्याय झाला तर काय कराल ?
1. लेखी तक्रार करा:
बँकेच्या ग्राहक सेवा विभागात एजंटच्या वागणुकीबाबत तक्रार नोंदवा. एजंटचे नाव, घटना घडलेली तारीख आणि पूर्ण माहिती तक्रारीत नमूद करा.
2. पुरावा संकलित करा:
फोन कॉल, मेसेज, किंवा धमक्यांचे रेकॉर्डिंग ठेवा. हे भविष्यात पोलिस किंवा बँकेकडे पुरावा म्हणून उपयोगी ठरेल.
3. पोलिसांत तक्रार करा:
जर एजंटने शारीरिक धमकी दिली, घरात जबरदस्ती केली किंवा अतिरेक केला, तर जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा. अशा वर्तनावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
आर्थिक अडचण असल्यास काय कराल ?
कर्ज फेडणे शक्य नसेल तर बँकेशी थेट संपर्क साधा. त्यांना तुमची सध्याची स्थिती स्पष्ट करून पुनर्रचना, हप्ता माफी किंवा नवीन परतफेड योजना यांसारख्या पर्यायांची विनंती करा. अनेक बँका अशा परिस्थितीत मदत करण्यास तयार असतात.