| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० मे २०२५
"जुने सोबती, सोनेरी क्षण" या म्हणीप्रमाणे, हिज हायनेस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, सांगली येथील १९७५ च्या (जुन्या) एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकताच सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलनाचा सोहळा शाळा प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला.
या सोहळ्याच्या निमित्ताने, पन्नास वर्षांपूर्वीचे मैत्र पुन्हा एकत्र आले. यावेळेस "बालपणीचे सवंगडी, आठवणींची ओंजळ" अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती. या संमेलनात मुंबई, नाशिक, पुणे, बेंगळुरु येथून माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. विशेष उल्लेखनीय म्हणजे, श्री. सतीश बाडगी हे अमेरिकेहून केवळ या स्नेहमेळाव्यासाठी आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. रसाळ सर होते. त्यांनी या सोहळ्याचे उत्तम आयोजन होण्यासाठी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन दिले. या सोहळ्याच्या यशस्वितेमागे शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. प्राची गोडबोले आणि सौ. वडेर मॅडम यांचे खूप मोठे योगदान होते. त्यांनी संयोजनाची जबाबदारी नेटाने सांभाळली.
"माझी शाळा, माझा अभिमान" या भावनेने भारावून गेलेल्या काहीजणांना जुन्या आठवणी जागवल्यावर डोळ्यांच्या कडा ओलावल्या इलाज राहिले नाही. लहानपणीच्या खोड्यांची धमाल किस्सेवजा चर्चा हास्याचा वर्षाव करीत होती. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री. धनंजय पोमाजे यांनी केले.
शाळेतील आदरणीय माजी शिक्षक पुराणिक सर, जोशी सर, गामाजी पाटील सर, म्हसकर सर व निबंधे मॅडम यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन कृतज्ञता सत्कार करण्यात आला. जोशी मॅडम वैद्यकीय कारणामुळे गैरहजर होत्या, पण त्यांच्या भाच्यांनी त्यांच्या वतीने सत्कार स्वीकारला. सर्व गुरुजनांनी आपले अमूल्य अनुभव आणि प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांपुढे मांडले.
"गुरू ब्रह्मा, गुरू विष्णु..." या उक्तीनुसार, गुरूदक्षिणा म्हणून माजी विद्यार्थ्यांनी शाळेला एक अद्ययावत डिजिटल बोर्ड भेट दिला. भविष्यात शाळेच्या गरजांसाठी आवश्यक गोष्टी देण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला.
या सोहळ्यात सतीश बाडगी, के. के. शहा, श्रीकांत बाणकर, नितीन नायक, अनिल परांजपे, अशोक जामदार, उदय शिंदे यांनी आपल्या भावना उलगडत, कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी श्री. उदय शिंदे यांनी सिंहगड रोपवेविषयी सविस्तर माहिती दिली आणि सर्व माजी शिक्षक व विद्यार्थ्यांना सिंहगड भेटीस येण्याचे प्रेमळ आमंत्रण दिले.
सांस्कृतिक कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. बिपिन शेवडे, गजानन फडके, अजय कुलकर्णी, सुनील पाटील, विजय सूर्यवंशी यांनी भावस्पर्शी हिंदी गीतांची सुंदर मैफल सादर केली. शा. कृ. पाटील यांनी आपल्या कवितेच्या सादरीकरणातून भावनांना शब्दरूप दिले. एकंदरीत मौज, मजा, मस्ती, धमाल असेच या स्नेहसंमेलनाचे वर्णन करावे लागेल.
या संमेलनाच्या संपूर्ण नियोजनात श्री. धनंजय पोमाजे (चार्टर्ड अकाउंटंट) आणि त्यांच्या इतर सहकारी शाळामित्रांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सौ. प्राची गोडबोले यांनी सहज आणि उत्साहीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. संजय जोगळेकर आणि श्री. मुकुंद कुलकर्णी यांनी केले.
"शाळा बदलते, पण आठवणी तशाच राहतात" हे या स्नेहसंमेलनाने पुन्हा सिद्ध केले.