| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० मे २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बँकांना शेतकऱ्यांशी वागणुकीबाबत ठणकावून सुनावले. “शेतकऱ्यांकडून वारंवार सी-बिल मागू नका, हे अनेकदा बजावलं गेलं आहे. तरीसुद्धा तुम्ही ते मागत असाल, तर त्यावर तोडगा सांगा,” अशा शब्दांत त्यांनी बँकांना जाब विचारला.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
बैठकीदरम्यान ॲक्सिस, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक यांच्यावर मुख्यमंत्री विशेष नाराज दिसले. वार्षिक ४४,७६,८०४ कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला. “कोणतीही बँक शाखा जर सी-बिल मागत असेल, तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, असा ठाम निर्णय मी आजच अपेक्षित करतो,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “सध्या दुष्काळाची स्थिती नाही, यंदा पीक चांगले येण्याची चिन्हे आहेत. अशावेळी बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करणे गरजेचे आहे.” त्यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे वाढते प्रमाणही अधोरेखित केले. “दावोसच्या दौऱ्यानंतर १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली आहे. महाराष्ट्र स्टार्टअप हब बनतो आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीसाठी हे क्षेत्र देखील महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोलीसारख्या भागांमध्ये औद्योगिक संधी वाढत असून, तिथे अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सूचित केले.
मुख्यमंत्र्यांनी बँकांना सुचवले की, सरकारच्या योजना राबवताना त्यांचे प्राधान्यक्रम समन्वयाने ठरवावेत. “बँकांनी सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम केल्यास सर्वांगीण विकास शक्य आहे. जे अधिकारी चांगले काम करतील, त्यांचा सन्मान करा आणि जे दुर्लक्ष करतील, त्यांची नावे पुढील बैठकीत समोर आणा,” असा स्पष्ट संदेश फडणवीसांनी दिला.