yuva MAharashtra पार्श्व पद्मावती मंदिराच्या ट्रस्टींनी रचला नवा इतिहास, पंचकल्याणक पूजेतील रकमेचा असा केला विनियोग !

पार्श्व पद्मावती मंदिराच्या ट्रस्टींनी रचला नवा इतिहास, पंचकल्याणक पूजेतील रकमेचा असा केला विनियोग !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० मे २०२५

सांगलीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पंचकल्याणक पूजा महोत्सवाचे औचित्य साधत पार्श्व पद्मावती मंदिर कमिटीने समाजसेेवेचा एक नवीन आदर्श उभा केला आहे. महोत्सवातील शिल्लक रकमेचा उपयोग विधायक कार्यासाठी करण्याचा निर्णय घेत, या रकमेतील एक लाख एकावन्न हजार रुपयांची देणगी ‘श्री शांतिसागर महाराज दत्तक पालक शिष्यवृत्ती योजनेसाठी’ दक्षिण भारत जैन सभेकडे सुपूर्द करण्यात आली.

सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी या उपक्रमासाठी केलेल्या आवाहनाला मंदिर कमिटीचे अध्यक्ष ॲड. उल्हास चिप्रे, महिला अध्यक्षा सौ. शैलजा चौगुले व सर्व ट्रस्टींनी तात्काळ आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.

या गौरवपूर्ण प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले, “समाजातील अनेक बुद्धिमान विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून दूर राहतात. योजनेसाठी निधी संकलनाचे आवाहन पूर्वी अनेक वेळा करण्यात आले असले तरी, प्रत्यक्ष देणगी देणारे हे पहिले मंदिर ठरले आहे. या कृतीतून सामाजिक बदलाची सुरुवात झाली असल्याचे आम्हाला वाटते.”


मंदिर कमिटीचे अध्यक्ष ॲड. उल्हास चिप्रे यांनी सांगितले की, "भालचंद्र पाटील दादांनी पूजेदरम्यान उपस्थितांमध्ये शिष्यवृत्ती योजनेसाठी देणगी देण्याचे प्रबोधन केले. हा उपक्रम फारच प्रेरणादायी असल्याने आमच्या सर्व ट्रस्टींनी एकमुखाने सहमती दर्शवली. समाजासाठी असे कार्य करणे ही आमची जबाबदारी आहे."

सभेच्यावतीने ॲड. उल्हास चिप्रे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टी स्वप्नील पाटील, राजेंद्रकुमार कांते, अमोल पाटील, सुहास पाटील, डॉ. प्रदीप शिरोटे, शितल चौगुले, चारूदत्त पाटील, सुरेश आडमुठे, प्रकाश चौगुले यांच्यासह शिष्यवृत्ती विभागप्रमुख सुनिल पाटील, बी. बी. शेंडगे, सीईओ योगेश खोत आदी मान्यवर उपस्थित होते.