yuva MAharashtra गटातटाचे राजकारण न करता, पक्षबळकटीला प्राधान्य : सम्राट महाडिक यांचा निर्धार !

गटातटाचे राजकारण न करता, पक्षबळकटीला प्राधान्य : सम्राट महाडिक यांचा निर्धार !

फोटो सौजन्य : दै. पुढारी  

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० मे २०२५

"मी कोणत्याही गट किंवा व्यक्तिपूजेला महत्त्व न देता, एक निष्ठावान भाजप कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे," असा निर्धार नूतन भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुढे आणून त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद अशा निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

सांगली येथे जिल्हाध्यक्ष पदग्रहण समारंभात ते बोलत होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात या वेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, संघटनमंत्री मकरंद देशपांडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, भाजप नेत्या नीता केळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे, संग्रामसिंह देशमुख, भगवानराव साळुंखे, शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, राजाराम गरुड, विलास काळेबाग व मिलिंद कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सम्राट महाडिक पुढे म्हणाले की, भाजपने दिलेले कार्यक्रम गावागावात पोहोचवण्याचे वचन मी देतो. भविष्यात सांगली जिल्ह्यात फक्त भाजपचा झेंडा फडकताना दिसेल.


विक्रम पावसकर म्हणाले की, सम्राट महाडिक यांची निवड पक्षाने विचारपूर्वक केली असून ते जिल्ह्यात पक्षसंघटना भक्कम करतील. आमदार पडळकर यांनी सांगितले की, महाडिक यांना पदासाठी मागणी करावी लागली नाही, तरीही पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली.

आमदार सत्यजित देशमुख म्हणाले की, महाडिक यांचे संघटन कौशल्य प्रभावी असून त्यांच्या पाठीशी भक्कम पाठिंबा देणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

पालिकांत भाजपचा झेंडा फडकणारच

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पावसकर यांनी सांगितले की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये भाजपची सत्ता नक्कीच प्रस्थापित होईल. सत्यजित देशमुख यांनी 60 पैकी किमान 40 जागांवर भाजप उमेदवार विजयी होण्यासाठी ठोस नियोजन करण्याचे आवाहन केले.