| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २० मे २०२५
भारतातील ज्येष्ठ आणि जगभर ख्याती प्राप्त खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. झोपेत असतानाच त्यांची जीवनयात्रा शांततेने संपली.
१९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे जन्मलेले डॉ. नारळीकर हे वैज्ञानिक क्षेत्रातील दैदीप्यमान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली आणि प्रसिद्ध ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत “हॉयल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत” मांडला, जो त्यांच्या संशोधनाच्या क्षेत्रातील एक क्रांतिकारी टप्पा ठरला.
भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत पद्मभूषण (१९६५) आणि पद्मविभूषण (२००४) या मान्यवर नागरी सन्मानांनी त्यांचा गौरव केला. १९८८ मध्ये त्यांनी ‘आयुका’ (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना करून संचालकपद भूषवले.
१९६६ मध्ये त्यांचा विवाह डॉ. मंगला नारळीकर यांच्याशी झाला. त्या स्वतः एक नामांकित गणितज्ज्ञ होत्या. त्यांच्या निधनाचे दु:ख जुलै २०२३ मध्ये पुण्यात झाले. त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या तीन कन्या आहेत – गीता, गिरिजा आणि लीलावती.
विदेशात यशस्वी वैज्ञानिक कारकीर्द घालवल्यानंतर १९७२ मध्ये डॉ. नारळीकर भारतात परतले आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला.
विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी विशेष प्रयत्न केला. त्यांच्या लेखनशैलीमुळे विज्ञान सहज आणि रोचक पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचत गेले. त्यांची अनेक पुस्तके विविध भाषांमध्ये अनुवादित झाली असून, त्यांनी लिहिलेल्या ललित लेखांमुळे विज्ञान अधिक लोकाभिमुख झाले.
डॉ. नारळीकर यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. भटनागर पुरस्कार, एम. पी. बिर्ला सन्मान, फ्रेंच ॲस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सन पुरस्कार, युनेस्कोचा 'कलिंग पुरस्कार' (१९९६) यांचा समावेश होतो. ते लंडनच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सदस्य तसेच इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी व थर्ड वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो होते.
डॉ. जयंत नारळीकर यांनी विज्ञानाच्या आकाशात आपल्या कार्याची तेजस्वी छाप सोडली आहे. त्यांच्या निधनामुळे भारताने एक थोर वैज्ञानिक आणि विज्ञानप्रेमी लेखक गमावला आहे.