yuva MAharashtra सांगलीसाठी ‘नमामि कृष्णा’ – कृष्णा नदीच्या पुनरुज्जीवनाची आमदार गाडगीळ यांची दिल्लीत जोरदार मागणी

सांगलीसाठी ‘नमामि कृष्णा’ – कृष्णा नदीच्या पुनरुज्जीवनाची आमदार गाडगीळ यांची दिल्लीत जोरदार मागणी

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. ६ ऑगस्ट २०२५

सांगली जिल्ह्याचा श्वास असलेल्या कृष्णा नदीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एकात्मिक उपाययोजना आवश्यक आहेत. याच दृष्टिकोनातून, जिल्ह्यात ‘नमामि कृष्णा’ या विशेष नदी विकास योजनेची अंमलबजावणी व्हावी, अशी ठाम भूमिका आमदार सुधीर गाडगीळ यांनी मांडली आहे. त्यांनी अलीकडेच नवी दिल्लीत केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

या भेटीत आमदार गाडगीळ यांनी कृष्णा नदीच्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्वावर प्रकाश टाकला. नदी ही जिल्ह्यातील जलपुरवठा, शेती, जैवविविधता, धार्मिक स्थळे आणि पर्यटन या सर्व बाबींचे मुख्य केंद्रबिंदू असून, सध्या अतिक्रमण, प्रदूषण आणि सांडपाण्याच्या विसर्जनामुळे ती संकटात सापडली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गाडगीळ यांनी सुचवले की, केंद्र सरकारने ‘नमामि गंगे’ आणि ‘साबरमती रिव्हर फ्रंट’ या यशस्वी प्रकल्पांच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यासाठीही तशाच स्वरूपाचा एकात्मिक नदी विकास आराखडा तयार करून ‘नमामि कृष्णा’ योजनेस गती द्यावी. या योजनेतून केवळ नदीच नव्हे, तर तिच्या काठावरील संपूर्ण परिसराचा पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि नागरी विकास शक्य होईल.

साबरमतीच्या बदलामुळे पर्यावरणीय सुधारणा, पर्यटन वृद्धी आणि नागरी सुविधा विस्तारास हातभार लागला आहे, हे उदाहरण देत, त्यांनी कृष्णा नदीच्या बाबतीतही तशीच सकारात्मक घडामोड घडविण्याचा आग्रह धरला.

‘नमामि कृष्णा’ ही योजना सांगलीच्या भविष्यासाठी निर्णायक ठरेल, याबाबत त्यांनी केंद्र सरकारकडून सकारात्मक पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.