yuva MAharashtra "अजितदादा मुख्यमंत्री होईपर्यंत विश्रांती नाही" — मंत्री हसन मुश्रीफ यांची कार्यकर्त्यांना साद

"अजितदादा मुख्यमंत्री होईपर्यंत विश्रांती नाही" — मंत्री हसन मुश्रीफ यांची कार्यकर्त्यांना साद

| सांगली समाचार वृत्त |
आटपाडी - बुधवार दि. ६ ऑगस्ट २०२५

आटपाडी (जि. सांगली) – "अजितदादा पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आपण थांबायचं नाही," अशी ठाम भूमिका राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे व्यक्त केली. युवकांना उद्देशून ते म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिथे शक्य आहे तिथे युती करून, अन्य ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवायची तयारी ठेवावी.

ही भूमिका त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित युवक मेळाव्यात मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन झाले होते. माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील आणि अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अनिल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आटपाडीच्या दुष्काळी ओळखीवरून सावरणारा हा भाग आता नव्या वाटेवर आहे. तरुणाईमध्ये ऊर्जा आहे आणि ती सकारात्मक मार्गाने राजकारणात वळवण्याचे काम अजितदादांचे नेतृत्व करत आहे.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, "तरुणांची ताकद केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता पक्षवाढीसाठी वापरली गेली पाहिजे. मात्र केवळ सत्तेच्या राजकारणात अडकून न राहता समाजकारणालाही आम्ही तितकेच महत्त्व दिले आहे. पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा ही प्रत्येक कार्यकर्त्याची नैसर्गिक इच्छा असते आणि आमच्या दृष्टिकोनातून ती व्यक्त करणे चुकीचे नाही."

पुढील काही महिन्यांत महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, "जिथे युती शक्य आहे तिथे एकत्र लढायचं आणि जिथे नाही तिथे पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरेल. या धोरणाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. कार्यकर्त्यांनी मात्र पूर्ण ताकदीने तयारीला लागावं."

“महायुतीतील तिन्ही घटकपक्षांनी एकमेकांवर टीका टाळून निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे. राष्ट्रवादीचा झेंडा महापालिकांपासून जिल्हा परिषदांपर्यंत फडकला पाहिजे,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

शेवटी, मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा संदर्भ देत सांगितले की, "फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आमच्या पक्षाच्या मूलभूत भूमिका आहेत. त्यामुळेच अल्पसंख्याक असूनही गेली २२ वर्षे मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला मिळाली आहे."