yuva MAharashtra "डॉक्टर आणि पोलीस – समाजरक्षणाचे अविरत प्रहरी" : पोलीस अधीक्षक संदीप घुगे

"डॉक्टर आणि पोलीस – समाजरक्षणाचे अविरत प्रहरी" : पोलीस अधीक्षक संदीप घुगे

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. ६ ऑगस्ट २०२५

संपूर्ण समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेले डॉक्टर आणि पोलीस हे दोघेही समाजाच्या आरोग्य आणि सुरक्षेचा कणा आहेत, असे मत सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केले. ते भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित 'महारेस्पि कॉन्कलेव्ह २०२५' या राज्यस्तरीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

बालरोग विभाग आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, सांगली जिल्हा व शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेचे उद्घाटन श्री. घुगे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी बालरोग तज्ञांशी संवाद साधत, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ सामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या राज्यव्यापी परिषदेत महाराष्ट्रभरातून २३० बालरोग तज्ज्ञांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर ४०० तज्ञांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला. एकूण ६३० डॉक्टरांनी उपस्थिती लावल्याने ही सांगलीतील पहिलीच हायब्रीड बालरोग परिषद ठरली.

प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज, उपाधिष्ठाता डॉ. अजित जोशी, वैद्यकीय अधीक्षक व परिषद अध्यक्ष डॉ. सारा धनवडे, बालरोग विभाग प्रमुख डॉ. सुहास कुंभार, डॉ. शरद घाडगे (आयपी सांगली सिटी), डॉ. अमोल पवार (सेक्रेटरी जनरल, महा आयपी), मिरजचे जेष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास, रेस्पिरेटरी चॅप्टरचे राज्याध्यक्ष डॉ. जयंत जोशी आणि एमएमसी निरीक्षक डॉ. विश्राम लोमटे यांचा समावेश होता.

दोन दिवसीय या परिषदेत वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी पेपर सादरीकरण व पोस्टर सत्र, तसेच विविध वर्कशॉप, सिम्पोझियम आणि पॅनल चर्चा आयोजित करण्यात आल्या. प्रारंभिक स्वागत डॉ. सारा धनवडे यांनी तर समारोपप्रसंगी आभारप्रदर्शन डॉ. सुहास कुंभार यांनी केले.