yuva MAharashtra संघर्षातून उभं राहिलेल्या कुटुंबाला न्याय : अण्णा भाऊ साठे यांच्या वारसांना नव्या घराचा दिलासा

संघर्षातून उभं राहिलेल्या कुटुंबाला न्याय : अण्णा भाऊ साठे यांच्या वारसांना नव्या घराचा दिलासा

| सांगली समाचार वृत्त |
वाटेगाव - मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०२५

जीवनभर अन्यायाविरुद्ध लढा देणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कुटुंबही गेली अनेक वर्षे अस्वस्थतेच्या छायेत जगत होते. मात्र अखेर त्यांचंही स्वप्न साकार झालं. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून अण्णा भाऊंच्या कुटुंबाला स्वतःचं हक्काचं घर मिळालं आहे. या नव्या वास्तूच्या प्रवेशामुळे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून आलं.

वाटेगावमध्ये पार पडलेल्या या नव्या वास्तूच्या अर्पण समारंभात आमदार रोहित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं, “अण्णा भाऊ साठेंनी समाजप्रबोधन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जो अमूल्य वाटा दिला, तो अविस्मरणीय आहे. दुर्दैवाने त्यांच्या स्मारकाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे, आणि त्यांचे घरही जर्जर अवस्थेत होतं. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हे छोटंसं योगदान दिलं आहे.”

या समारंभावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार सुधाकर भालेराव, महिला उपाध्यक्षा कविता म्हेत्रे, सावित्री साठे, सचिन साठे, गणेश भगत, सौरभ साठे, सरपंच नंदा चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील, माजी सभापती सुवर्णा जाधव, माजी सरपंच प्रकाश पाटील, प्रदीप देशमुख, धनाजी इंगळे, पुष्पा मुळीक, आणि डॉ. भूषण चौगुले यांचाही या क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मिळाला.

शब्दाला जागणारा नेता : रोहित पवार

महापुरुष अभिवादन यात्रेच्या निमित्ताने गेल्या वर्षी वाटेगावमध्ये झालेल्या सभेत रोहित पवार यांनी अण्णा भाऊंच्या घराची आणि कुटुंबीयांच्या परिस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेच्या वतीने १५ लाखांचा निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं. केवळ घोषणा करून थांबण्याऐवजी, त्या आश्वासनाला कृतीची जोड देत, एका वर्षात नव्या वास्तूचे स्वप्न पूर्णत्वास नेले गेले.