| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०२५
खटाव (ता. मिरज) येथील ग्रामपंचायत कार्यालयातील गैरप्रकारांवर कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष परशराम बनसोडे यांनी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आक्रोश केला. मात्र, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले.
बनसोडे यांनी यापूर्वी खटाव ग्रामपंचायतीच्या कामकाजात गंभीर आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचा आरोप करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीवर मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी चौकशी समितीची स्थापना केली होती. मिरज गटविकास अधिकारी यांच्या चौकशीत ग्रामपंचायत अधिकारी संजयकुमार गायकवाड यांच्यावर अनियमिततेचे ठपके ठेवण्यात आले आहेत.
तथापि, अहवाल प्राप्त होऊनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे पाहून बनसोडे यांनी पुन्हा प्रशासनाच्या दरवाज्यावर धडक दिली. त्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी लावून धरली. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी निषेध नोंदवताना अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा इशारा दिला.
या प्रकारामुळे जिल्हा परिषद कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धावपळ करत परिस्थिती नियंत्रणात आणली. विश्रामबाग पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत बनसोडे यांना ताब्यात घेतले.
प्रसंगी बोलताना परशराम बनसोडे म्हणाले, “ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्धचा दोषारोप अहवाल प्रशासनाकडे असूनही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळेच प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. जर कारवाई केली गेली नाही, तर येत्या १५ ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करणार,” असा इशाराही त्यांनी दिला.