yuva MAharashtra ‘जादा परताव्याचे आमिष’ दाखवत बचतगटाच्या महिला प्रतिनिधीची ८ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक

‘जादा परताव्याचे आमिष’ दाखवत बचतगटाच्या महिला प्रतिनिधीची ८ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक

| सांगली समाचार वृत्त |
जत - मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०२५

डफळापूर (ता. जत) येथील बचत गटाशी संलग्न असलेल्या एका महिलेला ऑनलाईन गुन्हेगारांनी ‘जास्त पैसे मिळतील’ या आमिषाने जाळ्यात ओढत तब्बल ₹८,०५,८१० ची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अर्चना दिलीप बेळुंखे (वय ३२, रा. विठ्ठलनगर, डफळापूर) यांनी जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपासाची सूत्रे सायबर विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत.

समाज माध्यमांचा वापर : गुन्हेगारांचे जाळे

दि. ९ ते १७ जुलै दरम्यान अर्चना बेळुंखे यांच्या टेलिग्राम अ‍ॅपवरील खात्यावर 'आर्या फातिमा' व 'अर्जुन प्रसाद' या नावांच्या युजरनेमधून संपर्क साधण्यात आला. 'टास्क पूर्ण करा आणि पैसे मिळवा' या प्रकारच्या संदेशाद्वारे त्यांना गुंतवण्यात आले. प्रारंभी काही प्रमाणात परतावा देत त्यांच्यावर विश्वास बसवण्यात आला आणि त्यानंतर मोठी रक्कम भरण्यास सांगितली गेली.

थोडक्या पैशात परताव्याचे मोठे आमिष

सुरुवातीला ८०० रुपये भरल्यानंतर त्यावर ₹१००० परत करण्यात आले. त्यानंतर रक्कम वाढवून ₹१००० भरल्यावर ₹३००० मिळाल्याने त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. मात्र जेव्हा ₹१ लाख मागण्यात आले, तेव्हा त्यानंतर कोणताही परतावा झाला नाही. परताव्याबाबत विचारणा केली असता ‘तांत्रिक प्रक्रिया, टॅक्स भरणे आवश्यक’ अशा कारणांनी वेळकाढूपणा करण्यात आला. याच पद्धतीने विविध बँक खात्यांमार्फत तब्बल आठ लाखांहून अधिक रक्कम उकळण्यात आली.

या प्रकारामुळे डफळापूर परिसरात खळबळ उडाली असून, टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरून होत असलेल्या फसवणूक प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सायबर गुन्ह्यांच्या नव्या युक्त्यांपासून सावध राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.