yuva MAharashtra पर्यटनासाठी देवराई सज्ज होणार, कधीकाळी कचरा डेपो ते देवराई प्रवास थक्क करणारा ठरणार

पर्यटनासाठी देवराई सज्ज होणार, कधीकाळी कचरा डेपो ते देवराई प्रवास थक्क करणारा ठरणार

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०२५

एखादं शहर ‘कचरा मुक्त’ करण्याचं स्वप्न केवळ धोरणांपुरतं मर्यादित राहतं, जर त्या मागे नागरिकांचा सक्रिय सहभाग नसेल. हा मुद्दा अधोरेखित करत, आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “प्रशासनासोबत नागरिकांनी खांद्याला खांदा लावून चालल्यासच स्वच्छतेचं ध्येय साध्य होईल. शहर हे जनतेचं प्रतिबिंब आहे, या विश्वासाने आम्ही पुढे जात आहोत.”

देवराई या परिसराला पर्यावरण पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महापालिकेने पावले टाकली असून, लवकरच हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक विशेष आकर्षण ठरेल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

बेडग वाडी रोड आणि समडोळी रोड – जिथे अनेक वर्षांपासून कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना नागरिक करत होते – आता त्या ठिकाणीच परिवर्तनाची झलक पाहायला मिळत आहे. हे कोणतंही चमत्कार नसून, हे आहे महापालिकेच्या कटिबद्धतेचं आणि अथक प्रयत्नांचं फलित!

कधी काळी जिथे संतप्त मोर्चे, आंदोलने आणि संताप व्यक्त होत होता, तिथेच आज नागरिक प्रशासनाचं अभिनंदन करत आहेत. "हे आमचं शहर आहे, आणि ते सुंदर ठेवायचं जबाबदारीही आमचीच आहे", हा भाव जनतेत निर्माण झाला आहे.

देवराई प्रकल्प साकारताना प्रशासन, अधिकारी, सफाई कर्मचारी, उद्यान विभाग, अभियंते – साऱ्यांनी जिवाचं रान केलं. या परिवर्तनाच्या प्रवासात, माजी आयुक्त नितीन कापडणीस यांनी बीजारोपण केलं; त्यानंतर सुनील पवार आणि शुभम गुप्ता यांनीही उल्लेखनीय योगदान दिलं. ही एक संघटित प्रयत्नांची साखळी होती.

आतापर्यंत: बेडग रोड कचरा डेपो येथून सुमारे ३.१३ लाख मेट्रिक टन कचरा हटवण्यात आला.

समडोळी रोडवरून सुमारे ६.६५ लाख मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला.

एकत्रितपणे जवळपास ९.७९ लाख मेट्रिक टन कचऱ्याची मुक्तता या भागांनी अनुभवली आहे.


आता पुढचा टप्पा म्हणजे ही स्वच्छ झालेली जागा पुन्हा कचरानिकेत न बनू देता, त्यावर दैनंदिन कचऱ्याच्या प्रक्रियेचे आधुनिक प्रकल्प उभारणे. आयुक्त सत्यम गांधी यांनी यासाठी ठोस पावले उचलली असून, नियोजनपूर्वक काम सुरु आहे. "टाईमबॉण्ड प्रोग्रॅम" अंतर्गत काम वेगाने राबवले जात आहे. नागरिकांनी केवळ ओला आणि सुका कचरा वेगळा करणे एवढेच सहकार्य केल्यास, उर्वरित प्रक्रिया प्रशासन उत्तमरित्या पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापालिका पुढील योजनांमध्ये अगरेसर

  • बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे व्यवस्थापन केंद्र
  • मृत जनावरांसाठी क्रेमेटोरियम
  • डॉग पाँड
  • ‘वेस्ट टू वेल्थ’ प्रकल्प
यासारखे विविध उपक्रम प्रस्तावित केले आहेत.


सांगली, मिरज आणि कुपवाड या त्रिस्थळी एक "स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणस्नेही शहर" बनवण्याच्या दिशेने महापालिका वाटचाल करत आहे – आणि या प्रवासात प्रत्येक सुजाण नागरिकाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.

उप आयुक्त स्मृती पाटील, पर्यावरण अभियंता अजित गुजराती, डॉ. रवींद्र ताटे, आणि उद्यान अधीक्षक गिरीष पाठक यांनीही देवराईच्या विकासासाठी उत्तम नियोजन आणि समर्पणाने काम केले आहे. या सर्वांचे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले असून, नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून कचरामुक्त शहरासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.