yuva MAharashtra शिंदे गटाकडून 'डिनर डिप्लोमसी' : राज ठाकरेंना विशेष आमंत्रण

शिंदे गटाकडून 'डिनर डिप्लोमसी' : राज ठाकरेंना विशेष आमंत्रण

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०२५

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा रंगतदार वळण घेत आहे. हिंदी सक्तीविरोधातील एका संयुक्त मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल दोन दशकेानंतर एकत्र आल्याने चर्चेला जोर मिळाला आहे. या मेळाव्यानंतर दोन्ही गटांमध्ये संभाव्य युतीची शक्यता चर्चेत असतानाच, आता शिंदे गटाकडून राज ठाकरेंना जेवणाचे आमंत्रण दिले गेल्याची माहिती पुढे आली आहे.

रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले. युतीबाबतच्या चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सूचित केले आणि योग्य वेळी औपचारिक घोषणा करण्यात येईल असेही सांगितले.

दरम्यान, राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले की, शिंदे गटाकडून राज ठाकरेंना औपचारिकपणे आमंत्रण दिले आहे. "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संवाद सुरू आहे, त्याचबरोबर आमच्याही बाजूने राजसाहेबांना आमंत्रित करण्यात आले आहे. ते कधी आमच्याकडे येतात, याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. लवकरच यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाईल," असे देसाई म्हणाले.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार परिणय फुके यांच्या 'शिवसेनेचा बाप मीच' या वक्तव्यावर वादळ उठले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, "सत्तेत सहभागी तीनही पक्ष समसमान आहेत. कोणालाही ‘बाप’ म्हणण्याचे अधिकार नाहीत. असा शब्दप्रयोग टाळणे योग्य ठरेल."