| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०२५
कोल्हापूरच्या नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातून गुजरातमधील ‘वनतारा’ प्रकल्पात हलविण्यात आलेल्या महादेवी या हत्तीणीच्या पुनर्प्रत्यावर्तनासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले असून, या जनआंदोलनाला महाराष्ट्रासह कर्नाटकातही जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
सध्या ‘महादेवी’ वनतारा प्रकल्पात सुरक्षीत असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे अधिकृत माहितीपत्रकातून कळविण्यात आले आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींना लोकभावनेचा भक्कम पाठिंबा असल्याने, राज्य सरकारदेखील हत्तीणीच्या परतीसाठी सकारात्मक पावले उचलत असल्याचं सूतोवाच करण्यात आलं आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी सांगितले की, “महादेवी हत्तीणीच्या बाबतीत पुढील निर्णय घेण्यासाठी उद्या तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संबंधित सर्व यंत्रणांशी संवाद साधून यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करू.”
या चर्चेत फडणवीस यांनी दादरमधील कबूतरखाना बंद प्रकरणालाही जोडून नमूद केले की, “दोन्ही बाबतीत न्यायालयीन आदेश कारणीभूत आहेत, परंतु शासनाची जबाबदारी आहे की लोकांच्या भावना आणि न्यायाचे निकष यामधील समतोल राखावा. हत्तीणीच्या मुद्द्यावर कायदेशीर आणि संवेदनशील मार्ग शोधण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत.”
दरम्यान, रविवारी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रस्त्यावर उतरून हत्तीणीच्या परतीची मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना वनतारा प्रकल्प व्यवस्थापनाने सांगितले की, न्यायालयीन संमती आणि वन्यजीव विभाग व जैन मठाच्या मान्यतेनंतरच हत्तीणीची परत पाठवणी शक्य होईल, अशी त्यांची अधिकृत भूमिका आहे.