| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ७ ऑगस्ट २०२५
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा - सुव्यवस्थेचा आढावा घेताना पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रलंबित गुन्ह्यांबाबत पोलिस यंत्रणेला ठोस कृतीचे आदेश दिले आहेत. मासिक आढावा बैठकीत त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई सुरू करण्याचा इशारा दिला.
बैठकीदरम्यान पोलिस अधीक्षकांनी थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रलंबित प्रकरणांचा तपशील मागवला आणि वेळकाढूपणावर नाराजी व्यक्त केली. गुन्हेगारांवर नजर ठेवत, तांत्रिक साधनांचा वापर करून गुन्ह्यांचा उलगडा करावा, अशी सक्त सूचना त्यांनी केली.गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जातीय सलोखा टिकविण्याच्या दृष्टीने गावागावांत समित्यांच्या बैठका घेण्यास सांगण्यात आले आहे. 'एक गाव, एक गणपती' उपक्रमालाही चालना देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
विशेष म्हणजे, गंभीर गुन्हे उघडकीस आणणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. २७ अधिकारी व ६५ अंमलदारांचा यामध्ये समावेश होता. याशिवाय, २८ जानेवारी २०२० रोजी कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या शौर्यपूर्ण कर्तृत्वासाठी राष्ट्रपतींच्या शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला.