| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ७ ऑगस्ट २०२५
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील थकीत पाणीपट्टीधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची सवलत जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, ज्या नागरिकांनी ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत संपूर्ण थकबाकी एकरकमी अदा केली, त्यांना विलंब दंड व व्याजातून संपूर्ण सूट मिळणार आहे. ही माहिती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.
महापालिकेच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोठा टप्पा ठरणाऱ्या या निर्णयामुळे नागरिकांना सुमारे १९ कोटी ६६ लाख रुपयांचे व्याज माफ होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
यासंदर्भातील ठराव महापालिकेच्या महासभेत २० जुलै २०२३ रोजी (ठराव क्र. ५७७) मंजूर झाला होता. त्यानंतर २० सप्टेंबर २०२३ रोजी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी आमदार गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत सतत लक्ष ठेवले. अखेर ६ ऑगस्ट २०२५ रोजी राज्य शासनाने अधिकृत निर्णय जाहीर केला.आता महापालिकेकडून या योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असून, नागरिकांना दिलासा मिळवून देणारी ही सवलत मोठ्या प्रमाणावर थकीत वसुलीस चालना देईल, असे आमदार गाडगीळ यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने हा निर्णय झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापालिका क्षेत्रातील नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत असून, आर्थिक भार कमी करणारी ही योजना जनतेसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.