| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ७ ऑगस्ट २०२५
गणेशोत्सवात जर डीजे संदर्भात प्रशासन दबाव टाकत असेल, तर मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा ठाम इशारा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. मिरज येथील महाराणा प्रताप चौकात आयोजित झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गणेशोत्सव पारंपरिक जोशात साजरा व्हावा, यासाठी कुणी अडथळा निर्माण करू नये, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती.
कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर एका कार्यकर्त्याने प्रशासनाच्या दबावाचा उल्लेख केला असता, सामंत यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत सांगितले की, "गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग असून, तो जल्लोषात झाला पाहिजे. जर कुणी मुद्दाम अडथळा निर्माण करत असेल, तर मी स्वतः मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणार आहे."त्यांनी पुढे नमूद केले की, कोकणातील गणेशोत्सव हा सर्व धर्मीयांसाठी एकत्र येण्याचे माध्यम असतो. तशाच पद्धतीने सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातही उत्सव एकात्मतेने आणि उत्साहात पार पडावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. "पोलिसांनी संयमाने वागावे आणि कार्यकर्त्यांवर अकारण दबाव आणू नये," असेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांचा उल्लेख करताना सामंत म्हणाले की, ही निवडणूक महायुतीच्या बळावर लढवायची असून, शिवसेनेने या पालिकांमध्ये ठोस अस्तित्व निर्माण करावे. "फक्त होते असे म्हणण्यापेक्षा, शिवसेनेचे सत्ताधारी नगरसेवक महापालिकेत आहेत, हे दाखवून द्या," अशी हाक त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. त्याचबरोबर मराठी भाषा आणि संस्कृतीसाठीही पालिकेच्या माध्यमातून भरीव कार्य होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमात एक हलकाफुलका क्षणही रंगला. व्यासपीठावर असलेल्या एका कार्यकर्त्याच्या गळ्यातील दागिन्यांकडे पाहून सामंत म्हणाले, "असं भरभरून सोनं घालून आमचा कार्यकर्ता फिरतोय, मग माझ्याही गळ्यात असंच सोनं घाला पाहू किती झेपतं!" आणि उपस्थितांमध्ये हास्याची लहर उसळली.
दरम्यान, समाजात काहींनी अशी चिंता व्यक्त केली आहे की, पोलिस यंत्रणा ध्वनीप्रदूषण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने डीजेवर निर्बंध लावण्याचा प्रयत्न करत असताना, राज्याचे मंत्रीच जर प्रशासनाला विरोध करत असतील, तर कायद्यान्वयनाच्या प्रक्रियेवर गालबोट लागण्याची शक्यता निर्माण होते.