| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५
मिरज : “नव्या-जुन्यांच्या वादात वेळ घालवू नका; येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय मिळवले पाहिजेत. संपूर्ण सांगली जिल्हा राष्ट्रवादीच्या विचारांनी बहरला पाहिजे,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
भोकरे कॉलेजच्या मैदानावर झालेल्या पक्ष मेळाव्यात पवार यांनी कार्यकर्त्यांना दिशा दाखवली. यावेळी अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सांगली शहराला पाणीटंचाईच्या विळख्यातून मुक्त करणे आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“विकासासाठी उद्योग, रोजगारासाठी नवे मार्ग”
अजित पवार म्हणाले, “सांगली हा स्वातंत्र्यवीरांचा वारसा लाभलेला जिल्हा आहे. येथील प्रगतीसाठी मोठमोठ्या उद्योगांना आकर्षित करणे आवश्यक आहे. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योगधंदे उभारणे हाच पुढील वाटचालचा मार्ग आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, यशवंतराव चव्हाणांनी घातलेल्या पायाभूत सुविधांच्या पाया पुढे नेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. सर्व समाजघटकांना समान प्रतिनिधित्व मिळावे, जातीय सलोखा टिकून राहावा आणि महिलांना मान-सन्मान मिळावा, यासाठी पक्ष कटिबद्ध आहे.
‘लाडकी बहीण योजना’ कायम ठेवणार
महिलांसाठी सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “बहिणींना शिक्षण, सन्मान आणि स्वावलंबन हेच आमचे ध्येय आहे. मुलगी गरिबीतून आली तरी तिचे शिक्षण थांबता कामा नये, म्हणूनच मोफत शिक्षणाचा निर्णय आम्ही घेतला आहे,” असे पवार म्हणाले.
आरक्षण, न्याय आणि प्रामाणिक प्रशासन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मागासवर्गीय व महिलांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात लढा दिला असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. “वशिल्याचे दिवस संपलेत; आता गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा यांनाच महत्त्व दिले जाईल,” असेही ते म्हणाले.
शेतकरी प्रश्न सोडवण्याची हमी
पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची जबाबदारी सरकार उचलणार असल्याचे पवार यांनी आश्वासन दिले. “कमी खर्चात, कमी पाण्यात आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेता यावे, यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर सुरू आहे. यावर राज्य सरकारने तीन वर्षे संशोधन केले असून आता त्याचे परिणाम दिसत आहेत,” असे ते म्हणाले.
‘एआय’च्या साहाय्याने भविष्याचा महाराष्ट्र
शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व अधोरेखित करताना पवार म्हणाले, “आता केवळ आर्टस्, कॉमर्स, सायन्सपुरते शिक्षण मर्यादित राहता कामा नये. एआय शिकवून महाराष्ट्रातील मुला-मुलींना नव्या युगासाठी सक्षम बनवले जाईल.”
कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश
शेवटी अजित पवारांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले – “जनतेच्या समस्या ओळखून सोडवा. मतदार श्रीमंत असो वा गरीब, त्याला दिलेले एक मत मौल्यवान आहे. तुमचे काम, प्रामाणिकपणा आणि कार्यपद्धतीच पक्षाला सांगली जिल्ह्यातील प्रत्येक प्रभागात विजयी करून दाखवेल. सांगली राष्ट्रवादीमय करण्याची जबाबदारी तुमची आहे.”