yuva MAharashtra महाराष्ट्र उद्योगासाठी ‘आकर्षणकेंद्र’; पायाभूत सुविधांच्या बळावर गुंतवणुकीत आघाडी

महाराष्ट्र उद्योगासाठी ‘आकर्षणकेंद्र’; पायाभूत सुविधांच्या बळावर गुंतवणुकीत आघाडी

| सांगली समाचार वृत्त |
मिरज - सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५

राज्यातील पायाभूत सुविधा सक्षम नसतील तर उद्योग दुसरीकडे स्थलांतरित होतात. परंतु महाराष्ट्रात ती परिस्थिती आता संपुष्टात आली असून, देश-विदेशातील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र ‘पहिली पसंती’ ठरला आहे. राज्यातील रस्ते, वीज, दळणवळण यासारख्या यंत्रणांचे बळकटीकरण झाल्याने महाराष्ट्र आज उद्योगविश्वातील ‘हब’ ठरल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मिरज तालुक्यातील कानडवाडी येथे महावितरणच्या वाढीव वीज उपकेंद्राचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या उपक्रमामुळे परिसरातील उद्योग, शेतकरी व नागरिकांना अखंड वीजपुरवठ्याचा लाभ मिळणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला आमदार सुरेश खाडे, महावितरणच्या संचालिका नीता केळकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, महाराष्ट्र चेंबरचे संचालक रमेश आरवाडे, मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कार्यकारी अभियंता आशिष मेहता, अधीक्षक अभियंता अमित बोकील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच स्थानिक नेतृत्वातून अनिल शेगुणशे, कुबेर गणे, शरद नलावडे यांच्यासह गावातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.