| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५
कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन होऊन केवळ न्यायदानाची नवी दारे खुली झाली नाहीत, तर संपूर्ण कोकण व पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर एक केंद्रबिंदू ठरले, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शनिवारी झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासह मंत्री, खासदार, जिल्ह्यांतील प्रतिनिधी व हजारो वकिलांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आजचा दिवस न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे. गवई साहेबांच्या दृढ संकल्पामुळे हे स्वप्न साकार झाले. सरकारचा यात अल्पसा वाटा असून, त्याचे आम्हाला समाधान आहे. सर्किट बेंचसाठी जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे तसेच १०० कोटींचा निधीही जाहीर केला आहे. आधुनिक सुविधांनी परिपूर्ण नवी इमारत उभारण्याचा आराखडा लवकरच तयार केला जाईल," अशी ग्वाही त्यांनी दिली.
फडणवीस पुढे म्हणाले की, "हा प्रकल्प फक्त न्यायालयापुरता मर्यादित राहणार नाही, तर कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग ठरणार आहे. नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी आवश्यक सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व आर्थिक मदत राज्य सरकारकडून अखंडपणे मिळेल. ५० वर्षांपूर्वी सुरू झालेला हा लढा अखेर यशस्वी ठरला असून, त्याचे श्रेय न्यायमूर्ती गवई यांना जाते," असेही त्यांनी नमूद केले.
कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाला न्याय देणारे हे पाऊल पुढील अनेक दशकांमध्ये विकासाचे अधिष्ठान ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.