| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आज निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका घेतली. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आयोगावर केलेल्या "मत चोरी"च्या गंभीर आरोपाला प्रत्युत्तर देताना, ७ दिवसांत पुरावे सादर करा किंवा देशाची माफी मागा, असा ठाम इशारा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिला.
राष्ट्रीय मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथे आज दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत आयोगाने पहिल्यांदाच या विषयावर प्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली. मतदार यादीतील फेरफार आणि निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकल्याचे राहुल गांधींचे आरोप निराधार असल्याचे सांगून आयोगाने पलटवार केला. "निवडणूक आयोगाचा कुठलाही पक्ष नाही, तो सर्वांसाठी समान आहे. मतदान प्रक्रियेची पारदर्शकता राखणे हाच आमचा उद्देश आहे," असे कुमार यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकातील निवडणुकांत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी आयोगाने मतदान डेटामध्ये फेरफार केला, असा दावा केला होता. यावर आयोगाने, "खरोखरच त्रुटी आढळल्यास, स्वाक्षरी केलेल्या प्रतिज्ञापत्रासह ठोस पुरावे सादर करा. अन्यथा देशाच्या जनतेची दिशाभूल केल्याबद्दल क्षमायाचना करा," अशी भूमिका घेतली.
पत्रकार परिषदेत आयोगाने "मतचोरी" या शब्दालाही कडाडून विरोध दर्शवला. "निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ४५ दिवसांच्या कालावधीत न्यायालयीन आक्षेप घेण्याची तरतूद आहे. ती न वापरता निवडणुकांनंतर आरोप करणे हे केवळ गोंधळ निर्माण करण्याचे साधन आहे," असे निरीक्षण मुख्य आयुक्तांनी मांडले.
कायद्यानुसार राजकीय पक्षांचे अस्तित्वच निवडणूक आयोगाच्या नोंदणीकृत मान्यतेवर अवलंबून असल्याने भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी नमूद केले. गेल्या दोन दशकांपासून सर्व पक्षांकडून मतदार यादी सुधारणा करण्याची मागणी होत असल्यानेच बिहारमधून विशेष पुनर्रचना प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले.
आयोगाच्या या ठाम भूमिकेमुळे, येत्या काही दिवसांत राहुल गांधी आपले आरोप समर्थित करण्यासाठी पुरावे सादर करतात की देशाची माफी मागतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.