| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १९ ऑगस्ट २०२५
सांगलीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या प्रेरणादायी वारशाला सलाम करत, विश्रामबाग गणपती मंदिराजवळील चौकाचे नामकरण ‘स्वा. विनायक दामोदर सावरकर चौक’ असे करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात, सावरकरांच्या कार्याची उज्ज्वल परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, "सावरकरांचे धैर्य, त्याग आणि दूरदृष्टी ही राष्ट्रनिर्मितीची अमूल्य ठेवा आहेत. चौकाला त्यांचे नाव देऊन त्यांना केलेली ही अभिवादनाची भेट, सांगलीकरांसाठी प्रेरणादायी ठरेल."
सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी धडाडीबरोबरच सामाजिक सुधारणांचे विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिले. त्यांच्यामुळे अनेक तरुण क्रांतीच्या मार्गावर चालले. आजही त्यांच्या विचारांची ऊर्जा समाजाला नवा जोम देते, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
या नामकरण सोहळ्यास आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, स्वा. सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय नामजोशी, सुनील देशपांडे, भास्कर कुलकर्णी यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चौकावरील नव्या नामफलकामुळे सांगलीतील तरुणाईला क्रांतिकारक सावरकरांचे तेजस्वी योगदान कायम स्मरणात राहील, असा विश्वास या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.