| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. ४ ऑगस्ट २०२५
राज्याचे प्रशासन सावरण्यात लक्ष केंद्रित करा, पक्ष वाढवण्यासाठी दुसऱ्यांना सामावून घेण्याच्या राजकारणात अडकू नका – असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी सत्ताधारी भाजपला दिला आहे.
अलीकडच्या काळात जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्हाला अपेक्षित असलेला प्रवेश सध्या तरी आमच्या विचारात नाही’ असे सूचक विधान करून चर्चा अधिकच तापवली.या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेत माध्यमांशी संवाद साधला. “भाजपमध्ये जाण्यासाठी मी कुठलाही अर्ज केलेला नाही. हा प्रश्न खुद्द मुख्यमंत्र्यांनाच विचारा. सत्तेच्या आसपास राहण्याची सवयच काही जणांना लागली आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्ष आजूबाजूच्या नेत्यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “सांगली जिल्ह्यात मीच एकटा मोठा नेता आहे, असं नाही. अनेक प्रभावशाली नेते येथे आहेत. त्यामुळे कोण कुठे जाणार, हे ठरवणं मुख्यमंत्र्यांचेच काम आहे.”
राज्यातील सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधत पाटील म्हणाले, “राज्यपातळीवर अनेक गंभीर समस्या आहेत. सरकारकडून सातत्याने त्रुटी होत आहेत. प्रशासन सुरळीत चालवले, तर जनतेचा विश्वास अधिक मिळेल आणि पक्षही आपसूकच बळकट होईल.”
मालेगाव स्फोट प्रकरणावर प्रश्नचिन्ह
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावरही त्यांनी भाष्य केले. “जर या प्रकरणात काहीच नव्हते, तर इतकी वर्षे हा खटला का चालला? न्यायालयाने निकाल दिला आहे, पण आजच्या घडीला न्यायप्रक्रियेवर बोलणं सुद्धा कठीण झालं आहे,” असे ते म्हणाले.