yuva MAharashtra सांगलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘क्रीडा संकुल’ उभारण्याची आमदार गाडगीळ यांची केंद्र शासनाकडे मागणी

सांगलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘क्रीडा संकुल’ उभारण्याची आमदार गाडगीळ यांची केंद्र शासनाकडे मागणी

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५

सांगलीतील भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence) स्थापन करण्याची मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली आहे. यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीया आणि राज्य राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट घेऊन अधिकृत निवेदन सादर केले.

सांगली जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि बुद्धिबळासह विविध खेळांमध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वाढती क्रीडा आवड, स्थानिक खेळाडूंची संख्यात्मक वाढ आणि आधुनिक प्रशिक्षणाची गरज लक्षात घेता, येथे सुसज्ज क्रीडा संकुल उभारणे आवश्यक असल्याचे आमदार गाडगीळ यांनी निवेदनात स्पष्ट केले.

त्यांच्या मते, सांगली हा क्रीडाप्रेमींसाठी महाराष्ट्रातील मध्यवर्ती भाग असून, येथे अद्ययावत सुविधा असलेले संकुल उभारल्यास ग्रामीण व शहरी भागातील नवोदित खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि प्रगतीची संधी मिळेल. यामुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा जिंकणारे खेळाडू घडण्यास मोठी मदत होईल.

केंद्रीय मंत्री मांडवीया आणि राज्यमंत्री खडसे यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अनुकूल निर्णय घेण्याची ग्वाही दिली. आमदार गाडगीळ यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पामुळे सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल.