| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चीनहून करचुकवेगिरीतून येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांच्या आयातीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. या बेकायदेशीर आयातीमुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडत असल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार लक्ष वेधूनही सरकारकडून ठोस निर्णय न आल्याने, शासनाची या प्रश्नाकडे असलेली गंभीरता संशयास्पद असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, यंदा हवामानातील अनियमिततेमुळे द्राक्ष उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी बेदाणा उत्पादनही कमी झाले आहे. अशा परिस्थितीत चीनमधून मोठ्या प्रमाणावर कर टाळून कमी प्रतीचे बेदाणे बाजारात येत आहेत. या दुहेरी धक्क्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच नव्हे, तर देशाच्या परकीय चलन साठ्यावरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या बाजारभावाची संपूर्ण मांडणी कोलमडली आहे.
पाटील यांनी पुढे सांगितले की, सांगली, नाशिक, जळगाव, सातारा यांसारख्या द्राक्षपट्ट्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यांना मदत म्हणून स्थानिक बेदाण्याचा समावेश शालेय पोषण आहार योजनेत करण्याची मागणी आम्ही सातत्याने मांडत आहोत. पण अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर मदत न देता, उलट चीनमधून बेदाणे आयात करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
सरकारच्या या उदासीन भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करत, पाटील यांनी तातडीने बेकायदेशीर आयात थांबवून विक्री रोखावी आणि स्थानिक द्राक्ष उत्पादकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.