| सांगली समाचार वृत्त |
नवीदिल्ली - शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५
स्वातंत्र्यदिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भारताला विकसित राष्ट्रांच्या मार्गावर नेणाऱ्या नऊ महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली. या उपक्रमांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेपासून सुरक्षेपर्यंत सर्व क्षेत्रांत भव्य बदल घडणार आहेत.
१. ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’
तरुणांसाठी रोजगारनिर्मितीचे नवे पर्व सुरू करत मोदींनी तब्बल १ लाख कोटी रुपयांचा रोजगार निधी जाहीर केला. या योजनेतून युवकांना उद्योजकतेसाठी भांडवल आणि कौशल्य प्रशिक्षणाची जोड मिळेल.
२. ‘नेक्स्ट जनरेशन’ जीएसटी सुधारणा
व्यवसायातील पारदर्शकता आणि करव्यवस्थेचा वेग वाढवण्यासाठी सरकार लवकरच जीएसटीत व्यापक सुधारणा आणणार आहे. यासाठी उच्चस्तरीय समितीचा अहवाल आधारे दिवाळीपर्यंत नवी रूपरेखा सादर होणार आहे.
३. ‘मिशन सुदर्शन चक्र’ – सर्वसमावेशक सुरक्षा कवच
देशाच्या प्रत्येक कोपऱ्याचे संरक्षण करण्यासाठी पुढील १० वर्षांत ‘सुदर्शन चक्र’सारखे तंत्रज्ञानाधारित सुरक्षा जाळे उभारले जाणार आहे. हे कवच हवाई, सागरी आणि स्थल मार्गांवर अखंड पहारा देईल.
४. ‘रिफॉर्म टास्क फोर्स’ – सुधारणांचा वेग वाढवणार
राष्ट्राच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी स्वतंत्र ‘रिफॉर्म टास्क फोर्स’ स्थापन होईल. हे पथक प्रलंबित सुधारणा ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करेल.
५. उच्चस्तरीय ‘डेमोग्राफी मिशन’
राष्ट्रीय सुरक्षेसाठी बेकायदेशीर घुसखोरी आणि अनियंत्रित स्थलांतर रोखण्यासाठी विशेष डेमोग्राफी मिशन सुरू होईल, जे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोकसंख्येचे सुयोग्य व्यवस्थापन करेल.
६. ‘नॅशनल डीपवॉटर एक्सप्लोरेशन मिशन’
समुद्रातील नैसर्गिक संपत्तीचा वापर वाढवून परदेशी इंधनावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी हे मिशन कार्यरत होईल. सागरी क्षेत्रातील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनाला गती मिळेल.
७. ‘नॅशनल क्रिटिकल मिनरल्स’ अभियान
भारतातील १,२०० ठिकाणी महत्त्वाच्या खनिजांचा शोध घेऊन त्यांचा औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वापर वाढवला जाईल. यामुळे देशाची खनिज सामर्थ्य वाढेल.
८. अणुऊर्जा क्षमतेत दहापट वाढ
पुढील २० वर्षांत देशात १० नवीन अणुभट्ट्या उभारून अणुऊर्जा उत्पादन दहापट वाढवण्याचा संकल्प पंतप्रधानांनी मांडला. यामुळे स्वस्त वीज उपलब्ध होऊन ऊर्जास्वावलंबन साध्य होईल.
९. स्वदेशी लढाऊ विमानांचे जेट इंजिन
रक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी भारतातच प्रगत जेट इंजिन निर्मिती केली जाईल. यासाठी शास्त्रज्ञ आणि तरुण अभियंत्यांना नवोन्मेषासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.