| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५
देशभरात जल्लोषाच्या वातावरणात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ध्वजारोहण समारंभात राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनीच्या शुभेच्छा देत, अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी कृतज्ञतेने वंदन केले.
फडणवीस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा विशेष उल्लेख करत, भारतीय लष्कराच्या धाडसी कारवाईचे कौतुक केले. पाकिस्तानच्या दहशतवादी तळांचा संपूर्ण नाश करून भारतीय सैन्याने जगासमोर भारताची क्षमता सिध्द केल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अर्थव्यवस्थेत झेप घेत चौथ्या क्रमांकावर पोहोचल्याचा उल्लेख त्यांनी अभिमानाने केला आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्राचा देशाच्या प्रगतीतील मोठा वाटा असल्याचे अधोरेखित करताना फडणवीस म्हणाले की, परदेशी गुंतवणुकीपैकी तब्बल ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्राकडे येते. निर्यात, वस्तू निर्मिती आणि स्टार्ट-अप्सच्या क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांसाठी तर त्यांनी आनंदाची बातमी दिली — पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. तसेच ‘मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प’अंतर्गत २०२६ च्या अखेरपर्यंत दिवसा १२ तास हरित वीज पुरवठा सुनिश्चित होणार असून, हे देशात पहिल्यांदाच घडणार आहे. नदीजोड प्रकल्पांमुळे शेती आणि उद्योग दोघांनाही मुबलक पाणी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव संपुष्टात आणण्यात पोलिसांनी यश मिळवले असून, या भागाचे स्टील हबमध्ये रूपांतर सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीत समृद्धी महामार्ग, बंदर विकास, विमानतळांचे आधुनिकीकरण आणि गावागावांत सिमेंट रस्ते यांसारखे प्रकल्प गतीमान असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांची शिकवण हेच महाराष्ट्राचे मार्गदर्शक तत्त्व असून, त्याच मार्गाने राज्य प्रगतीपथावर नेण्याचा निर्धार फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनी केला.