| सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५
वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात पवार घराण्याचा राजकीय पट रंगून गेला. शरद पवार यांच्या बहिणी व माजी मंत्री एन. डी. पाटलांच्या पत्नी सरोजताई पाटील यांनी आयोजिलेल्या या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, आमदार जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. या मंचावर शब्दांची खेळी, टोलेबाजी आणि कौतुकाचे फुलोरे एकत्र अनुभवायला मिळाले.
स्वागतपर भाषणात सरोजताईंनी पवार कुटुंबातील नेतृत्वाची चुणूक मांडताना रोहित पवारांचे वर्णन “घराण्यातील उगवता तारा” असे केले. अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाला त्यांनी “वरून कठोर पण आतून गोड” असे उपमा दिले, तर रोहितबद्दल बोलताना “तो खरं-खोटं निर्भीडपणे मांडतो, आणि एन. डी. पाटलांची परंपरा पुढे नेत असल्यासारखा वाटतो” अशा शब्दांत गौरव केला.
मात्र यानंतर अजित पवारांनी या “उगवत्या ताऱ्याला” कडवे वास्तव दाखवले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील त्याच्या निवडणुकीतील संकटांचा उल्लेख करत, “भावकीच्या आधारामुळेच तू आमदार झालास, नाहीतर काय अवस्था झाली असती ते जयंताला विचार,” असा थेट चिमटा त्यांनी काढला. एवढेच नव्हे तर “जास्त चुरचुर बोलू नकोस, माझ्या पंगतीला लागलास तर परवडणार नाही,” असा इशाराही दिला.
याचबरोबर, रोहित पवारांनी सरोजताईंचा उल्लेख “माई” असा केला होता. त्यावरही अजितदादांनी हजरजबाबी टोमणा मारत, “त्या खरं तर तुझ्या आजी आहेत, आणि तू त्यांना माई म्हणतोस? घरी गेल्यावर बघतात बघ कसे,” असे म्हणत वातावरणात हशा पिकवला.
इस्लामपूर येथीलया कार्यक्रमात पवार घराण्यातील कौतुक, टोलेबाजी आणि राजकीय सत्यकथन यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. एका बाजूला उगवत्या तार्याची स्तुती होती, तर दुसऱ्या बाजूला भावकीच्या आधाराने टिकलेल्या राजकारणाचे वास्तव उघडे पडले.