| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. ४ ऑगस्ट २०२५
नांदणी मठात महादेवी हत्तीण पुन्हा यावी यासाठी सर्व धर्मीय समाजाने दाखवलेली सलोखीची भावना आणि एकजूट ही अत्यंत प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी आज नांदणी येथे काढले. हत्तीण परत आणण्याच्या लढ्यात तसेच ती नांदणी मठात परतल्यानंतर तिच्या देखभालीसाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा ठाम शब्द त्यांनी दिला.
आज दुपारी या दोन्ही युवा नेत्यांनी नांदणी मठात भेट देऊन पूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या संवादात त्यांनी मठाचा ऐतिहासिक वारसा, जैन समाजाच्या भावनांची जुळवाजुळव, महादेवीच्या संगोपनाचा अनुभव, न्यायालयीन प्रक्रियेतील घडामोडी आणि वनतारा प्रकल्प प्रशासनासोबत झालेली चर्चा आदी विषयांवर विचारमंथन केले.
या चर्चेवेळी भट्टारकांनी समाजाच्या विविध स्तरांमधून मिळणाऱ्या व्यापक पाठिंब्याचा उल्लेख करत, मठ हा सर्व समाजासाठी खुला असल्याची भावना व्यक्त केली.
कदम आणि पाटील यांनी आश्वासन दिले की, न्यायालयीन प्रक्रिया असो वा केंद्र शासनाच्या स्तरावरील हालचाली – महादेवीच्या पुनरागमनासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आम्ही वैयक्तिक आणि पक्षीय पातळीवर करणार आहोत. हत्तीण परत आल्यानंतर तिच्या निवास, आरोग्य आणि सुरक्षेसाठी लागणाऱ्या सोयीसुविधांची जबाबदारीही आम्ही घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर या नेत्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या नांदणी ते कोल्हापूर पदयात्रेतही सहभाग घेतला. यात्रेच्या मार्गात त्यांनी श्री. शेट्टी यांच्यासोबत चर्चा केली आणि सहभागी तरुण कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या.
"सामूहिक एकजूट हीच आपल्या लढ्याची ताकद आहे, ती अशीच टिकवा. परिवर्तन नक्की घडेल," असा विश्वास कदम आणि पाटील यांनी तरुणांना दिला. यावेळी डॉ. अमोल चिमाण्णा, शीतल थोटे, संतोष वंजाळे, संदीप आडमुखे, विशाल चौगुले, बी. डी. पाटील, अमित पाचोरे आदी पदयात्रेत सहभागी झाले होते.