| सांगली समाचार वृत्त |
सांगली - सोमवार दि. ४ ऑगस्ट २०२५
सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या प्रतिष्ठित संस्थेच्या नव्या अध्यक्षपदी श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांची, तर उपाध्यक्षपदी ॲड. एस. पी. मगदूम यांची निवड करण्यात आली. ही निवड संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेत एकमुखाने झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी श्री. ए. एन. कोळी (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सांगली) होते.
सध्या ६४ शाखांद्वारे सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या कर्मवीर पतसंस्थेने आर्थिक स्थैर्य आणि तांत्रिक प्रगतीचा मोठा टप्पा गाठला आहे. संस्थेच्या एकूण ठेवी १२४५ कोटी, कर्जवाटप ९५३ कोटी, तर गुंतवणूक ४७६ कोटी इतकी असून, मागील आर्थिक वर्षात संस्थेला १५.५५ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. स्वनिधी १३० कोटींच्या पुढे गेला आहे. ६७,००० हून अधिक सभासद असलेल्या संस्थेची बँकिंग सेवा आधुनिक कोअर बँकिंग प्रणालीवर आधारित आहे. NEFT/RTGS, मोबाइल बँकिंग, SMS अलर्ट्स, लॉकर सुविधा यांसारख्या सेवा संस्थेमार्फत दिल्या जात आहेत.
नवीन अध्यक्षा श्रीमती भारती चोपडे या संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका असून, याआधी त्यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. सहकारी क्षेत्रात त्यांना दीर्घ अनुभव असून, अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्या सक्रिय सहभाग घेऊन कार्यरत आहेत.
उपाध्यक्षपदी निवड झालेल्या ॲड. एस. पी. मगदूम हेही संस्थेचे अनुभवी संचालक असून, याआधी ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सहकार भारतीच्या सांगली शहराध्यक्षपदासह विविध पदांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या मजबूत जनसंपर्काचा आणि प्रशासकीय जाणिवेचा फायदा संस्थेच्या कामकाजात होणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बैठकीचे प्रास्ताविक संचालक श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. त्यांनी मागील पाच वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत, संचालक मंडळ, सभासद आणि कर्मचारी वर्गाचे आभार मानले. तसेच नवनिर्वाचित नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या समृद्धीसाठी वचनबद्ध असल्याचे सांगत, सर्व घटकांनी संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यावेळी संचालक डॉ. अशोक सकळे, डॉ. रमेश ढबू, ओ. के. चौगुले, वसंतराव नवले, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. चेतन पाटील, सौ. चंदन केटकाळे, आप्पासो गवळी, बजरंग माळी, अमोल रोकडे, डॉ. नरेंद्र खाडे, लालासाहेब बोटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदुम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता सीईओ अनिल मगदुम यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.