yuva MAharashtra मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्वाचे निर्णय : नव्या धोरणांवर मंजुरीची मोहोर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्वाचे निर्णय : नव्या धोरणांवर मंजुरीची मोहोर

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. ६ ऑगस्ट २०२५

महाराष्ट्राच्या विकासमार्गाला चालना देणारे सात ठळक निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. स्टार्टअप क्षेत्रातील युगांतरकारी धोरणापासून ते सामाजिक कल्याणाच्या योजनांपर्यंत विविध निर्णयांना मान्यता मिळाली.

🔹 "स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५" ला मंजुरी
कौशल्यविकास, रोजगारनिर्मिती आणि नाविन्याला चालना देणारे धोरण जाहीर करण्यात आले. नव्या उद्योगांची निर्मिती, इनोव्हेशनला प्रोत्साहन आणि तरुणांना स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा निर्धार या माध्यमातून अधोरेखित झाला.

🔹 फ्रेट कॉरिडॉरसाठी हिरवा कंदील
वाढवण बंदर ते समृद्धी महामार्गाच्या भरवीर बिंदूपर्यंतचा मालवाहतूक मार्ग विकसित करण्यासाठी नियोजन व भूसंपादनास मान्यता मिळाली असून, राज्याच्या औद्योगिक विकासासाठी ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे.

🔹 लहान व अकार्यक्षम जमिनींच्या वाटपासाठी विशेष धोरण
बांधकामास अयोग्य, अरुंद, पोहोच मार्ग नसलेल्या व लॅण्ड लॉक्ड जमिनींच्या वितरित धोरणाला मान्यता मिळाल्याने अशा भूखंडांचा उपयोग अधिक परिणामकारकपणे करता येणार आहे.

🔹 एसटी महामंडळाच्या जमिनींचा व्यावसायिक वापर शक्य
राज्य परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा व्यावसायिक हेतूने वापर करण्यास सरकारने परवानगी दिली असून, सुधारित धोरणाद्वारे महसूलवाढीचा नवा मार्ग खुला झाला आहे.

🔹 नागपूर विणकर सूतगिरणी कामगारांसाठी सानुग्रह सहाय्य
सूतगिरणीतील ११२४ कामगारांना ५० कोटींच्या मदतीस मान्यता मिळाली असून, हा निधी सूतगिरणीच्या मालमत्तेच्या विक्रीतून उपलब्ध केला जाणार आहे.

🔹 पाचोरा भूखंडाच्या आरक्षणात बदल
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आरक्षित क्रीडांगणाचा समावेश आता रहिवासी क्षेत्रात केला जाणार आहे, ज्यामुळे नागरी विकासाला चालना मिळेल.

🔹 कुष्ठरुग्णांसाठी सेवाकार्यातील संस्थांना अनुदानवाढ
कुष्ठरोग्यांसाठी कार्यरत संस्थांना दिले जाणारे मासिक अनुदान २ हजारांवरून थेट ६ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले असून, ही सामाजिक दृष्टीकोनातून मोठी पावले उचलली गेली आहेत.