yuva MAharashtra वैद्यकीय महाविद्यालय मिरजमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीबाबत सकारात्मक प्रतिसाद

वैद्यकीय महाविद्यालय मिरजमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीबाबत सकारात्मक प्रतिसाद

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. ३ ऑगस्ट २०२५

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे अधिष्ठाता डॉ. गुरव यांच्याशी झालेल्या विशेष चर्चेत सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांवर विचारविनिमय करण्यात आला. विशेषतः अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना वारसा हक्काने नोकरीचा लाभ मिळावा, जे कार्यकाळात प्रत्यक्ष सफाईविषयक कामांशी संबंधित होते, यासंदर्भात बैठक सुस्पष्ट ठरली.

यावेळी अधिष्ठाता डॉ. गुरव यांनी आस्थापना विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक दस्तऐवज सादर करून, शासन परिपत्रक दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ आणि लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने, सकारात्मक प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे दीर्घकाळ रखडलेल्या मागण्यांना चालना मिळाली असून, पन्नासहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

या पुढाकारामागे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांचे मोलाचे योगदान असून, शासन धोरणांच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शासनाची धोरणे ही सामाजिक समावेशकता, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती या तत्त्वांवर आधारित असून, ती सर्व ठिकाणी प्रभावीपणे लागू होण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.

या बैठकीस तालुकाप्रमुख महादेव सातपुते, स्वप्नील मस्कर, राजेंद्र आंबी, आशिष साळुंखे, ढोबळे, कांबळे आणि सफाई कर्मचारी वर्गाचे वारसदार उपस्थित होते.